करदाते व प्राप्तिकर विभाग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या परस्परांवर अवलंबून आहेत. करदाते हे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून आणि योग्य तो सन्मान देऊन कर जमा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. करदात्यांनी प्राप्तिकर विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य प्राप्तिकर आयुक्त जे. एम. सहाय यांनी केले. निमा हाऊस येथे औद्योगिक, व्यापारी, सल्लागार, ग्राहक संघटना व प्राप्तिकर विभागाच्या संयुक्त बैठकीत सहाय हे बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कर समितीचे सदस्य दिग्विजय कपाडिया, नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे, नाशिकच्या प्राप्तिकर आयुक्तांसह नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी आदी उपस्थित होते. प्रारंभी बेळे यांनी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना जाणवणाऱ्या करविषयक अडचणी मांडल्या. कपाडिया यांनी सभेची पाश्र्वभूमी थोडक्यात मांडली. त्यानंतर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सतीश बूब, निमातर्फे चार्टर्ड अकाऊंटंट शिवदास डागा आदींनी प्राप्तिकराच्या संदर्भात विविध अडचणी सविस्तरपणे मांडल्या. या अडचणींबाबत प्राप्तिकर आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन केले. आभार संतोष मंडलेचा यांनी मानले. सूत्रसंचालन निमा चर्चासत्र आणि कार्यशाळा उपसमितीचे अध्यक्ष व्हिनस वाणी यांनी केले. बैठकीस निमाचे माजी अध्यक्ष अशोक राजवाडे, उपाध्यक्ष किशोर राठी, विजयकुमार गुप्ता आदींसह मालेगावचे उद्योजक व औद्योगिक, व्यावसायिक, कर सल्लागार, ग्राहक आदी शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.