मेघालयाच्या सीएमजे विद्यापीठामार्फत राज्यातील अनेक शिक्षकांनी पीएच.डी. आणि एम.फिल.च्या बनावट पदव्या मिळवल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने या पदवीच्या लाभार्थ्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. अशा बनावट पदव्यांच्या आधारे उमेदवारांना शिक्षक पदावर नियुक्त्या देऊ नयेत, तसेच करण्यात आलेल्या नियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात, असा आदेश शासनाने काढला आहे.
एम.फिल. आणि पीएच.डी. या अजूनही उच्च दर्जाच्या आणि प्रतिष्ठित पदव्या मानल्या जातात. अध्यापकाच्या नोकरीत वरचा दर्जा गाठण्यासाठी ही पात्रता आवश्यक झाल्यामुळे त्यांचे महत्त्व आणखी वाढले आहे. या पदव्यांचा दर्जा राखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी नियम तयार केलेले असून, त्यानुसारच विविध विद्यापीठे एम.फिल. किंवा पीएच.डी. पदव्या प्रदान करत असतात. यूजीसीच्या नियमांनुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच विद्यापीठांनी या पदव्या देणे अपेक्षित आहे.
तथापि, शिलाँग (मेघालय) येथील सीएमजे विद्यापीठाने यूजीसीच्या नियमांनुसार आवश्यक असलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता पीएच.डी. पदव्या खिरापतीसारख्या वाटल्याचे निदर्शनाला आले आहे. या पदव्यांच्या सोसामुळे संबंधित उमेदवारांनीही येनकेनप्रकारेण त्या पदरी पाडून घेतल्या असून, तशी कागदपत्रे आपापल्या विद्यापीठांकडे सादर केली आहेत. यामुळे या पीएच.डी.साठीचे मार्गदर्शक (गाइड)ही धोक्यात आले आहेत. अशा रीतीने निर्धारित प्रक्रियेचा अवलंब न करता देण्यात आलेल्या अवैध पदव्या मिळवणाऱ्या उमेदवारांवर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांतील तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांच्या पदांवरील नियुक्तीसाठी ज्या उमेदवारांनी सीएमजे विद्यापीठाचे पीएच.डी./ एम.फिल. पदवीचे बनावट प्रमाणपत्र सादर केले आहे, अशा उमेदवारांना त्या पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये, तसेच अशा बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ज्यांना विद्यापीठात किंवा संलग्न महाविद्यालयात नियुक्त्या अथवा सेवेचे इतर लाभ देण्यात आले असल्यास, अशा नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात याव्यात, असा आदेश या विभागाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या नावाने काढला आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ किंवा इतर लाभ देण्यात आले असल्यास ते काढून घ्यावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सीएमजे विद्यापीठाच्या बनावट पदव्यांच्या आधारे नियुक्त्या देण्यात आलेल्या उमेदवारांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश ती नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून, सीएमजेप्रमाणेच इतर विद्यापीठाच्या बनावट पदव्या कुणी सादर केल्या आहेत काय हे पाहण्यासाठी त्या पदवी प्रमाणपत्रांचीही पडताळणी करून त्यानुसार कारवाई करावी, असे या आदेशात म्हटले आहे. विद्यापीठे किंवा संलग्न महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ज्या शिक्षकांनी पीएच.डी.ची प्रमाणपत्रे सादर केली आहेत, त्या सर्वाच्या पदव्यांची तपासणी करून कुलगुरूंनी त्या वैध असल्याचे प्रमाणित करावे, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.