24 October 2017

News Flash

शिक्षकांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार

ऑनलाइन कामांमुळे मन:स्थिती बिघडली

अकोले, वार्ताहर | Updated: September 17, 2017 3:19 AM

शिक्षण विभागाच्या अधिकृत व्हॅट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडून अकोल्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी ऑनलाइनच्या कामावर बहिष्कार टाकला. 

अकोल्यातील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकला आहे. पंचायत समिती परिसरात झालेल्या सभेत हे शिक्षक सामुदायिकरीत्या शिक्षण विभागाच्या अधिकृत ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटामधून बाहेर पडले. ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशी या शिक्षकांची मागणी आहे.

संगणक प्रणाली वापरून शिक्षण विभागाची विविध प्रकारची ऑनलाइन प्रशासकीय कामे करताना शिक्षकांचा शिकवण्याचा प्रचंड वेळ वाया जातो. त्याचा मुलांच्या शिकण्यावर, शिकवण्यावर आणि पर्यायाने शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून यापुढे आम्ही अशी ऑनलाइन कामे करणार नाही, असे सांगण्यासाठी आज, शनिवारी पंचायत समितीसमोर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीची सभा झाली. सुमारे पाचशे शिक्षक, मुख्याध्यापक या सभेसाठी जमले होते.

ऑनलाइन कामांना विरोध नाही, मात्र त्यासाठी आर्थिक तरतूद करून स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणावी. प्रगत शैक्षिणक महाराष्ट्र अंतर्गत पटसंख्येइतक्या उत्तररपत्रिका पुरवाव्यात, लोकसहभागाची सक्ती करू नये, प्रशासकीय आदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून न देता लेखी वा तोंडी कळवावेत, सरकारी शाळांना सवलतीच्या दरात वीज द्यावी, फेसबुक, ट्विटर वापरायची सक्ती करू नये, शासकीय उपक्रमात सेवावर्ग केलेल्या शिक्षकांच्या जागी तातडीने शिक्षक नेमावेत आदी मागण्या करण्यात आल्या. तहसीलदार महेश कांबळे व प्रभारी गटविकास अधिकारी सचिन कोष्टी यांना निवेदने देण्यात आली.

ऑनलाइन कामांनी गांजलेले शिक्षक केंद्र आणि तालुका पातळीवरील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून सभास्थानीच बाहेर पडले. यापुढे आम्ही कोणत्याही प्रकारची ऑनलाइन कामे करणार नसल्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी या वेळी ठामपणाने सांगितले. आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या, अशी हाक या वेळी जमलेल्या शिक्षकांनी दिली. अनिल मोहिते यांनी प्रास्ताविक केले. भास्कर कानवडे, सुनील धुमाळ, विठ्ठल म्हशाळ, भाऊसाहेब चासकर, सुनीता रूपवते यांची या वेळी भाषणे झाली.

ऑनलाइन कामांमुळे मन:स्थिती बिघडली

प्रशासनाकडून सतत ऑनलाइन कामांचा तगादा लावल्याने, कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. त्यातून बीपी, मधुमेहासारखे आजार जडले असून तणावाखाली वाहने चालवताना अपघात होऊन, काही शिक्षक, मुख्याध्यापकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची सल सुनीता रूपवते यांनी उदाहरणासह बोलून दाखवली. तेव्हा सगळेच उपस्थित हेलावले.

First Published on September 17, 2017 3:19 am

Web Title: teachers boycott online work in akola