जनगणना, नैसर्गिक आपत्ती व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया याव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे शासन निर्देश असले तरी प्राथमिक शिक्षकांना वर्षभर विविध अशैक्षणिक कामांना जुंपण्यात येत असल्याने खदखद असतानाच आता ऐन परीक्षेच्या हंगामात मतदार नोंदणीसह आधारकार्ड व भ्रमणध्वनी जोडण्याचे काम शिक्षकांच्या माथी मारण्यात आल्याने त्यांच्या नाराजीत भर पडली आहे. या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेत शिक्षकांनी बीएलओ कामांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राथमिक शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांना अध्ययनाशिवाय कुठलीही कामे देण्यावर र्निबध आहेत. तसेच शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्यानंतर जनगणना, नैसर्गिक आपत्ती व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया याव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत, असे निर्देश शासनाने काढले. असे असले तरी मतदार नोंदणी, मतदार जनजागृती व मतदार स्लीप वाटणे यांसारखी कामे शिक्षकांना आतापर्यंत करावी लागली आहेत. शिक्षकांना गुणवत्ता विकास कार्यक्रम, शालेय पोषण आहार, शाळा खोली बांधकाम अशा जबाबदाऱ्या सांभाळून अध्ययनाचे काम करावे लागत असताना केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती देत मतदार याद्यांची कामे त्यांच्याद्वारे करवून घेण्यात येतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत असल्यामुळे बीएलओंची कामे करणाऱ्या शिक्षकांना कित्येकदा पालकांची नाराजी सहन करावी लागत असते.
अशा प्रकारच्या अशैक्षणिक कामांना विरोध केला जात असताना बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांवर आता मतदार नोंदणीसह मतदारांचे आधारकार्ड व भ्रमणध्वनी जोडण्याचे आव्हानात्मक काम सोपविण्यात आल्याने त्याला कडाडून विरोध सुरू झाला आहे.
सध्या परीक्षेचा हंगाम सुरू असल्याने परीक्षेसंबंधीची कामे करतानाच आगामी दोन महिन्यांत विद्यार्थी सर्वेक्षण, पटनोंदणी अशी महत्त्वाची कामे शिक्षकांना करावयाची आहेत. त्यामुळे बीएलओंची कामे शिक्षकांना सोपवू नयेत, अशी मागणी करतानाच शिक्षक संघटनांनी त्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे येथील नायब तहसीलदार जगदीश निकम व गटविकास अधिकारी सिद्धार्थ अजवेलकर यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आली. शिष्टमंडळात संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र दिघे, दादाजी काकळीज, मिलिंद भामरे, संजय शेवाळे, विनायक ठोंबरे आदींचा समावेश आहे.