१७ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर शिक्षकाला न्याय मिळाला खरा; परंतु मुख्याध्यापक पूर्वपदावर रुजू करून घेत नाही, तसेच शिक्षण विभागही दखल घेत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले शिक्षक शिवदास मारुती मुंडे यांनी ३१ मार्चपर्यंत शाळेवर रुजू करून न घेतल्यास केव्हाही व कोठेही आत्मदहन करण्याचाच इशारा दिला आहे. अतिरिक्त शिक्षकाची आत्महत्या, तसेच एका शिक्षकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नात जिल्हा प्रशासन हैराण झाले असतानाच आणखी एका शिक्षकाने आत्मदहनाचा इशारा दिल्याने यंत्रणा सर्द झाली आहे.
जि. प. अंतर्गत अतिरिक्त शिक्षक हिरामण भंडाणे यांनी पगारासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली, तर भास्कर दगडू जोगदंड या शिक्षकाने संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून विष घेतले. त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येपाठोपाठ शिक्षकांच्या आत्महत्यांनी जिल्हा प्रशासन बेजार झाले असतानाच केज तालुक्यातील गणेश विद्यालयात १७ वर्षांपूर्वी सहशिक्षक असलेल्या शिवदास मारुती मुंडे या शिक्षकानेही ३१ मार्चपर्यंत न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. मुंडे यांना गणेश विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असताना १७ वर्षांपूर्वी तोंडी आदेशाने काढून टाकण्यात आले. त्यांनी औरंगाबादच्या शाळा न्यायाधिकरणात अपील केले. पुढे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. तब्बल १४ वर्षांनंतर न्यायालयाने शाळा न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द ठरवून मुंडे यांचे अपील मंजूर करीत १७ वर्षांचा ३० टक्के पगार देऊन पूर्वपदावर रुजू करून घेण्याचा निर्णय दिला.
जानेवारी महिन्यात हा निर्णय दिल्यानंतर मुंडे यांनी शिक्षण विभाग व शाळेला अर्ज देऊन रुजू करून घेण्याची मागणी केली. मात्र, शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक रुजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने मुंडे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन ३१ मार्चपर्यंत रुजू करून न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.