शाळेसाठी दररोज करावी लागणारी सहा ते आठ किलोमीटरची पायपीट थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सायकल मिळावी, तसेच शाळेतील शिक्षकांची रिक्त असलेली आठ पदे तातडीने भरली जावीत, या मागणीसाठी कळमनुरी तालुक्याच्या शेवाळा येथील जि. प. शाळेतील विद्यार्थिनींनी गुरुवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक मारली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून त्या तत्काळ सोडविण्याची ग्वाही या वेळी दिली.
या बरोबरच आमदार डॉ. संतोष टारफे व शिक्षण सभापती अशोक हरण यांचीही या विद्यार्थिनींनी भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. आमदार डॉ. टारफे यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कळमनुरी तालुक्यातील देवजना गावातील विद्यार्थिनी ८ किलोमीटर अंतरावरील शेवाळा येथील शाळेत शिक्षण घेण्यास येतात. कवडी येथील विद्यार्थीही ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेत येतात. दोन्ही गावच्या ६४  विद्यार्थिनींना रोजची पायपीट करीत शिक्षण घ्यावे लागते. सरकारने विद्यार्थिनींना शिक्षण घेण्याबाबत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र, या दोन गावच्या विद्यार्थिनींना सरकारच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. जि.प.कडून किमान सायकल तरी मिळावी, या अपेक्षेप्रमाणेच शाळेत मुख्याध्यापकांसोबत इतर शिक्षकांची रिक्त असलेली ८ पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी करीत सुमारे ६४ विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांच्या दालनात आल्या. त्यांनी आपल्या अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. याबाबत माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही बनसोडे यांनी दिली.
याच वेळी आमदार डॉ. संतोष टारफे जि. प. कार्यालयात आले असता शिक्षण सभापती अशोक हरण यांच्या दालनात विद्यार्थिनींनी आमदार व सभापतींची भेट घेऊन त्यांचेही समस्यांबाबत लक्ष वेधले. हरण यांनी तात्काळ समाजकल्याण अधिकारी कुंभारगावे व महिला बालविकासच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांना बोलावून घेत चर्चा केली. विद्यार्थिनींना लवकर सायकल देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.