‘बीएसएनएल है, तो भरोसा है’ असे बिरुद मिरविणाऱ्या भारत संचार निगमने त्यांच्याच ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. दूरध्वनी अनामतीपोटी दिलेली रोकड अनेकदा मागणी करूनही परत दिली जात नाही. सुमारे दोन हजारांहून अधिक दूरध्वनीधारकांचे लाखो रुपये ‘बीएसएनएल’ने अडवून ठेवले आहेत. यातील काही जणांनी ग्राहक मंचात धाव घेतली, तर काही जण न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहेत. दूरध्वनीबरोबरच १० वर्षांपूर्वी ‘बीएसएनएल’चे पोस्टपेड सीमकार्ड घेणाऱ्या मोबाइलधारकांच्या अनामतीचेही असेच गौडबंगाल आहे.
घरात दूरध्वनी असणे ही दहा वर्षांपूर्वी कौतुकाची बाब होती, मात्र आता या ग्राहकांसाठी हाच दूरध्वनी डोकेदुखी ठरू लागला आहे. ‘कनेक्टिंग इंडिया’ अशी जाहिरातबाजी करणाऱ्या ‘बीएसएनएल’च्या वाटय़ाला सर्वाधिक डिस्कनेक्शन येऊ लागले आहेत. अनियमित सेवा, सेवेतील विस्कळीतपणा, अवाच्या सवा देयके यामुळे वैतागलेल्या ग्राहकांनी खासगी दूरध्वनी सेवेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपला दूरध्वनी बंद करून अनामत म्हणून जमा केलेली रक्कम परत मिळावी, अशी सुमारे अडीच हजार ग्राहकांनी मागणी केली आहे. यातील अनेकांची अनामत रक्कम अजून मिळाली नाही. आपली रक्कम परत मिळावी, म्हणून तगादा लावणाऱ्या ग्राहकांना अधिकारी कधीच जागेवर भेटत नाहीत. त्यातही बहुतेक यंत्रणेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हवाली करण्यात आला आहे.  दहा वर्षांपूर्वीची पावती आणा, तुमचे पसे मिळतील, असे सरधोपट उत्तर देऊन कंत्राटी कर्मचारी हात वर करतात. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जागेवर ऐन वेळी एकही अधिकारी वा कर्मचारी उपलब्ध नसल्याचा अनुभव अनेक ग्राहकांना येतो.
अनेक खासगी दूरध्वनी कंपन्या पर्याय म्हणून अलीकडे मोठय़ा वेगात पुढे आल्याने ‘बीएसएनएल’च्या गळतीला वेग आला आहे. १० वर्षांपूर्वी ५५ हजार दूरध्वनी ग्राहक होते, आता ही संख्या १८ हजारांवर खाली आली आहे. यातही सेवा खंडित करण्यासाठी दरमहा १००हून अधिक ग्राहक स्वेच्छेने अर्ज दाखल करीत आहेत. रीतसर सर्व प्रक्रिया पार पाडूनही मागील ७ महिन्यांपासून आपली अनामत लटकली असल्याचा आरोप ६२वर्षीय बब्रुवान सुरवसे यांनी केला. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी आपला घरचा दूरध्वनी बंद करून त्याची अनामत परत मिळावी, अशी मागणी केली. त्यांना तशी पोचही ‘बीएसएनएल’ने दिली. त्यांच्यापूर्वी अशी मागणी करणाऱ्या दोन हजार ग्राहकांची अनामत अडकली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवेळी अनामतीची रक्कम पुणे येथून तुम्हाला मिळून जाईल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अनामत रक्कम लवकर परत न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा सुरवसे यांनी दिला.