भाटनिमगांव (ता. इंदापूर जि. पुणे) येथील एका अकरा वर्षीय मुलाचा नात्यातीलच एकाने ऊसाचा फडात नेऊन रूमालाने गळा दाबून खून केला. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळ (ता. माढा, जि. सोलापूर) येथे गुरूवारी सांयकाळच्या सुमारास घडली. इंद्रकुमार पंजाब गायकवाड असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. यातील संशयित विश्वास जनार्दन साळुंखे (वय ४०, मूळ रा. परंडा, जि. उस्मानाबाद, हल्ली मुंबई) हा करमाळा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. तसेच त्याने खून केल्याची कबुली दिली.

अधिक माहिती अशी, भाटनिमगाव येथील यात्रा असल्यामुळे गायकवाड व साळुंखे हे सर्व नातेवाईक एकत्र जमले होते. संशयित विश्वास याने इंद्रकुमार त्याचा चुलतभाऊ आर्यन गायकवाड (वय ११) या दोघांना मासे नेण्यासाठी भीमानगर येथे घेऊन आला. तेथे आल्यानंतर त्याने टेंभुर्णी येथे चांगले मासे मिळतील, असे सांगून येथे त्यांना आणले. त्यानंतर आर्यन याला आम्ही पाच मिनिटात येतो, असे सांगून आर्यन याला उजनी पाटी येथील रसपानगृहात सोडले. तेथून तो इंद्रकुमार याला शिराळ येथील आश्विनी ढाब्याच्या पाठीमागे घेऊन आला. तेथील उसाच्या फडात त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर संशयित विश्वास हा सायंकाळी सहाच्या सुमारास करमाळा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने इंद्रकुमार याच्या खुनाची कबुली दिली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. उजनी पाटीजवळ थांबलेला आर्यन हा इंद्रकुमार विश्वजित लवकर आल्याने रडायला लागला. त्याचे रडणे ऐकून रसपानगृहचालकाने त्याला भाटनिमगाव येथे सोडले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची टेंभुर्णी पोलिसांत नोंद झाल्याने आणि तो करमाळा पोलिसांत हजर झाल्याने खुनाचे कारण समजू शकले नाही.
इंद्रकुमार हा पंढरपूर येथील एमआयटी शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता. गावची यात्रा असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तो भाटनिमगाव येथे आला होता. संशयित विश्वास साळुंखे हा इंद्रकुमारच्या वडिलांचा मावसभाऊ आहे, असे समजते.