मागील पंधरा दिवसांपासून अचानकपणे तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा पारा ३६.५ अंशांवर गेला असून दुपारी १२ नंतर रस्त्यांवरील पादचारी तसेच वाहनांची वर्दळ कमी होत आहे. उन्हापासून बचावासाठी घर, कार्यालयांमध्ये पंखे, कुलर, एसी तर घराबाहेर पडताना टोप्या, स्कार्फचा वापर वाढू लागला आहे.

चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे शिवारातील तलाव, जलसाठय़ांमध्ये अनेक दिवसांनी पाणी साठले. पावसाळ्यानंतर थंडीचाही जोर वाढला होता. शेतशिवार आणि गावाभोवतालचे जलसाठे भरल्याने शेतीपिकांना भरपूर पाणी मिळत आहे. परिणामी जमिनी पानथळ बनून रात्रीच्या वेळी थंडीचा जोर कायम राहिला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून मात्र खरीप आणि रब्बी हंगामातील पिके काढणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर थंडी ओसरली आहे. सकाळी १० नंतर उन्हाचा पारा वाढू लागला आहे.  दरवर्षी महाशिवरात्रीपासून उष्णतेला सुरुवात होत असते. शुक्रवारी महाशिवरात्री साजरी झाली. या दरम्यान उकाडा वाढू लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. आता मात्र ३६.५ पारा गेल्याने उन्हाबाहेर पडताना नागरिक काळजी घेऊ लागले आहेत.  कामानिमित्त अनेक नागरिक भर उन्हात घराबाहेर पडतात. रस्त्याच्या कडेला उसाचा रस, फळांचे ज्यूस व नारळपाण्याचे स्टॉल्स लागले आहेत. त्यामुळे उन्हाने थकलेल्या नागरिकांचे पाय आपसूकच अशा स्टॉल्सकडे वळू लागले आहेत. आइस्क्रीम व अन्य थंडपेय टाळून नागरिक नारळपाणी, ऊस आणि फळांचा रस पिणे पसंत करीत आहेत.