‘विठ्ठला, राज्य प्रगतिपथावर येऊ दे, राज्यातील जनतेला सुख,समाधान, शांती लाभू दे, राज्यावर येणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे,’ अशी प्रार्थना विठ्ठलाची महापूजा झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विठ्ठल चरणी केली. यंदा मुख्यमंत्री चव्हाण यांचे समवेत महापूजा करण्याचा मान जालना जिल्हा जाफराबाद येथील शेतकरी व मजुरी करणारे नामदेवराव देऊचा वैद्य त्यांच्या पत्नी गंगूबाई नामदेव वैद्य यांना मिळाला. गेल्या २५ वषार्ंपासून पंढरपूरची वारी ते करत आहेत. यंदाची आषाढी यात्रा १० लाखांच्यावर भरली होती.
एस.टी.चा वार्षिक प्रवास पास मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांना दिला, तर मानाचे वारकरी वैद्य यांना मनोज भेंडे यांचेकडून १५ हजार, तर यवतमाळ येथील कृष्णा कडू यांच्याकडून ११ हजार रुपये देण्यात आले. समितीचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, पालक मंत्री दिलीप सोपल, आमदार विलास लांडे, आमदार सुरेश खाडे, समिती अध्यक्ष अण्णा डांगे, सर्व सदस्य, माजी आमदार उल्हास पवार, जि. प. अध्यक्षा निशिगंधा माळी, पुणे आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वत्र टाळ-मृदंग-वीणा यांचा निनाद, विठ्ठल, विठ्ठल, ज्ञानोबा तुकोबा जयघोष, अन बरसणाऱ्या पावसाच्या धारा अशातच वारकरी प्रदक्षिणा पहाटेपासूनच करत होते. वरून पाऊस बरसत असतानाही मुखी विठ्ठल नाम घेत चंद्रभागा स्नान करून नगरप्रदक्षिणा करत होते.
पालखी सोहळा निघाल्यापासूनच सर्वत्र वरुण राजाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला होता.  पावसाने सर्वाची तारांबळ उडाली. छोटे छोटे व्यावसायिक यांची त्रेधातिरपीट झाली. या पावसाने सर्वत्र चिखल अन पाणीच पाणी झाले आहे.