तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांचे हातपाय तोडून ठार करण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्य़ातील आदिवासींनी एकत्र येत नक्षल्यांच्या धमकीला न घाबरता तेंदू संकलनाचे काम जोरात सुरू केले आहे. गरीब आदिवासींचे संपूर्ण वर्षांचे अर्थकारण तेंदू हंगामावर अवलंबून असतांना नक्षलवाद्यांनी नेमका त्यालाच विरोध केल्याने स्थानिक आदिवासी चांगलेच संतापले आहेत. त्याचाच परिणाम आदिवासी कृती समिती गठीत करून संकलनाच्या कामाला सुरुवात केली आहे.
नक्षलग्रस्त या जिल्ह्य़ात तेंदूपत्ता हंगाम हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण, स्थानिक आदिवासींचे अर्थकारण शेती व तेंदू हंगाम या दोनच गोष्टींवर अवलंबून असल्याने ते या दोन गोष्टींना अतिशय महत्व देतात. तेंदू हंगामात तर आदिवासी लोक सहपरिवार तेंदूपाने वेचण्याचे काम करतात. यातूनच त्यांना वर्षेभराची कमाई होते. मात्र, नक्षलवाद्यांनी फतवा काढून तेंदू संकलनाला तीव्र विरोध केला आहे. १९ मे रोजी नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम भागातील प्रत्येक गावात पत्रके वाटून, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून तेंदू संकलन करणाऱ्याचे हातपाय तोडून ठार मारण्याची धमकी दिल्याने आदिवासींमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. पोलिस दलात नोकरी करू नका, पोलिस खबरे, एसपीओ, कोतवाल व पोलिस पाटलांनी तात्काळ काम बंद करावी, अशा आवाहनासोबतच नक्षल्यांनी थेट तेंदू संकलनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने स्थानिक आदिवासींच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिदुर्गम भागातील बहुतांश गावातील आदिवासी नक्षल्यांच्या या फर्मानला घाबरले असले तरी एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली या गावातील आदिवासींनी नक्षल्यांच्या या फतव्याचा तीव्र विरोध केला आहे.
आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून नक्षल्यांच्या या आवाहनाला विरोध करून गट्टेपल्लीतील गावकरी तेंदू संकलनासाठी नियमित जात आहेत. आजवर आम्ही नक्षलवाद्यांना प्रत्येक गोष्टीत सहकार्य करत आलो. मात्र, आता तर ते आमची रोजी रोटीच हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संपूर्ण गट्टेपल्ली गाव एकत्र आले असून नक्षलवाद्यांच्या विरोधात कृती समिती गठीत करून तेंदू संकलनाचे काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचेही धाबे दणाणले आहे. आजवर या भागात नक्षलवाद्यांचा शब्द एकाही गावकऱ्याने किंवा गावाने खाली पडू दिला नाही. मात्र, आता अख्खे गावच नक्षलवाद्यांच्या विरोधात उभे ठाकल्याने नवा संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हे येथे दिसत आहेत. तेंदू संकलन हा आमचा हक्काचा परंपरागत व्यवसाय आहे तेव्हा आम्ही संकलन करणारच, असा आग्रही भूमिका गट्टेपल्ली गावकऱ्यांनी घेतली आहे.
भाजीपाला, दूध, दही व अंडय़ांचा पुरवठा खंडीत
तेंदू संकलनासोबतच नक्षलवाद्यांनी अहेरी, सिरोंचा, एटापल्ली या भागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दूध, दही, अंडी व भाजीपाल्याचा पुरवठा करू नये, असेही फर्मान सोडले आहे. त्यामुळे या भागात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला, दूध,दही व अंडय़ांचा पुरवठा खंडीत झालेला आहे.