चिपळूण येथील आगामी साहित्य संमेलनाबाबतच्या सर्व वादांवर चर्चा करून समन्वयाची भूमिका घेणार असल्याचे सांगत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव कायम ठेवणार असल्याचा पुनरुच्चार रविवारी केला.
एका कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये आलेल्या सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. साहित्यिकांना ‘बैल’ असे संबोधणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला देण्याबाबत ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी हरकत घेतली होती, तर प्रा. पुष्पा भावे यांना चिपळूणमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. त्याविषयी विचारले असता तटकरे म्हणाले, याविषयी साहित्यिक आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढण्यात येईल. मात्र, संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या घेतलेल्या निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही.