निंबोळी गावातील सभेत केलेले वक्तव्य ही आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनातील सर्वांत मोठी चूक होती. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली.
इंदापूरमधील निंबोळीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका करण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावतीने माफी मागितली. अजित पवारांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेची माफी मागितली.
अजित पवार म्हणाले, कोणच्याही भावना मला दुखवायच्या नव्हता. माझा तो हेतू नव्हता. ही गोष्ट खरी आहे की राज्यात महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना मी शब्दांचा वापर जबाबदारीने करायला हवा. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला कोणतीही बाधा पोहोचू नये, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आजपर्यंत सार्वजनिक जीवनात काम करताना आतापर्यंत अनेक चढउतार मी पाहिले आहेत. मात्र, हे वक्तव्य माझी सर्वांत मोठी चूक होती.