शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सव्‍‌र्हेलन्स टीमने पकडलेली ८ लाख रुपयांची रक्कम ही राजकीय पक्षाच्या उमेदवार अथवा कार्यकर्त्यांशी संबंधित नव्हती. या रकमेचा वापर निवडणुकीत केला जाणार नव्हता हे तपासात निष्पन्न झाल्याने ती उद्योजकास परत करण्यात आली.
शिर्डीचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी प्रकाश थवील यांनी स्टॅटिक सव्‍‌र्हेलन्स टीम तैनात केली असून या टीमने औद्योगिक वसाहतीजवळ एमएच १७ एबी ५११ या मोटारीतून ८ लाख रुपयांची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम उद्योजक मोहन संतोषदास चूग यांची होती. तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी याप्रकरणी चौकशी करून प्रकरण आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले होते. आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी चूग यांची कागदपत्रे तपासली. त्यानंतर ही रक्कम मार्चअखेरीच्या हिशोबाकरिता आली होती. ती व्यवहारातील असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर रक्कम आज चूग यांना परत करण्यात आली.