मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला टोलनाक्यावर टोल भरताना अचानक आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तातडीने या ठिकाणी अग्नीशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. त्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या कोपरी परिसरात जो टोलनाका आहे त्या ठिकाणी सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मारुती कंपनीच्या स्विफ्ट डिझायर कारला अचानक आग लागली. कार चालक टोल भरत असतानाच कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. टोल कर्मचारी आणि रांगेत असलेले इतर वाहनचालक यांच्यात गोंधळही उडाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टोलनाक्याचे कर्मचारी आणि रांगेत असलेल्या नागरिकांनीही आपल्या परिने प्रयत्न केले. मात्र आग काही नियंत्रणात आली नाही. अखेर अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग नियंत्रणात आली. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये. ठाण्यात थोडा पाऊसही पडत होता. मात्र भर पावसात ठाणेकरांना बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला.