लाठीमारानंतर शेतकऱ्यांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक, ११ पोलीस जखमी
परभणी जिल्ह्य़ात मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू असताना ढालेगाव व ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांनी ‘आश्वासने नकोत कर्जमाफीचे बोला’ अशी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला रस्त्यात अडथळा निर्माण होऊ नये, या साठी पेडगाव फाटय़ावर भाकप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, सिंगणापूर फाटय़ावर माकप कार्यकत्रे व पोलीस यांची धुमश्चक्री होऊन पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून माकप कार्यकत्रे व शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाडय़ांवर जोरदार दगडफेक केली. यात २ पोलीस अधिकाऱ्यांसह ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या चार गाडय़ांचे मोठे नुकसान झाले.
मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले असता सुरुवातीला ढालेगाव फाटय़ावर त्यांनी भाषण सुरू केले. या वेळी काही शेतकऱ्यांनी उठून कर्जमाफीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ताडबोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हाच प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या घोषणेने भंडावून सोडल्यानंतर पुढे अडथळा येऊ नये, म्हणून पोलिसांनी माकप, भाकप कार्यकत्रे व शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ताडबोरगावाहून निघण्यापूर्वीच भाकपच्या कॉ. राजन क्षीरसागर यांच्यासह ४० कार्यकर्त्यांना अटक करून पोलीस मुख्यालयात आणण्यात आले.
असाच प्रकार सिंगणापूर फाटय़ावर होत असताना माकपच्या कॉ. विलास बाबर यांनी अटकेस विरोध केला. पोलीस जबरदस्तीने कार्यकर्त्यांना गाडय़ांमध्ये कोंबत असताना झटापट झाली. पोलिसांनी दबंगगिरी करीत थेट शेतकऱ्यांवर लाठय़ाकाठय़ा चालवण्यास सुरुवात केली.
यामध्ये काही शेतकरी किरकोळ जखमी झाले, तर पोलिसांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस गाडय़ांवरच दगडफेक केली. यात पोलीस व्हॅनसह तीन पोलीस जीपच्या काचा फोडण्यात आल्या. दगडफेकीत गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय कुहीकर, सहायक निरीक्षक सुनील पुंगळे, हवालदार शबीर पठाण, मोईन कॅप्टन, कांबळे, श्रीमती लटपटे, नागरे यांच्यासह १३ जण जखमी झाले.