मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत शासनाने तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करूनही येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर अद्यापि सुरू केले नाही, तसेच कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक आणि रक्तपेढीची पदे भरण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घाईगडबडीत ट्रॉमा सेंटरची जागा पाहून कामाचा शुभारंभ करूनही आरोग्य खात्याने दुर्लक्ष केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तज्ज्ञ डॉक्टरांची शासकीय रुग्णालयातील पदे भरण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीची रक्तपेढी तांत्रिक पदाची भरती करावी म्हणून अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून आंदोलने झाली. त्यानंतर शासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सन २०१२ मध्ये याचिकाही दाखल करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील डॉक्टरांची रिक्त पदांची स्थिती आजही कायम आहे. जिल्ह्य़ात तापसरीच्या साथीने धुडगूस घातला आहे. आज अनेक घरांत अख्खे कुटुंब तापाच्या साथीने फणफणत आहे. त्यानंतर खासगी व सरकारी रुग्णालयांत रुग्ण धाव घेत आहेत. त्यावर उपाय शोधण्यास आरोग्य खाते प्रयत्न करीत आहे. जिल्ह्य़ाचे सुपुत्र डॉ. दीपक सावंत आरोग्यमंत्री असल्याने त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत; पण डॉक्टर सिंधुदुर्गात येण्यास तयारच होत नाहीत हेही त्यामागचे एक कारण सतावत आहे. सिंधुदुर्गात हीच स्थिती काही वर्षे सुरू आहे. साधा भाजलेला, तसेच अपघात घडलेल्या रुग्णाला सरकारी हॉस्पिटलमधून थेट गोवा बांबुलीला पाठविले जायचे म्हणून अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून आंदोलने, उपोषणे करण्यात आली. त्यानंतर आरोग्य खाते व शासनाविरोधात अभिनव फाऊंडेशनने सन २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील तेरा वर्षांपूर्वीची खंडाळा येथील रक्तपेढी असल्याने स्टाफ भरला जात नव्हता. रक्तपेढी तांत्रिक कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात नव्हते म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होतात. जिल्हा शल्यचिकित्सकांनी न्यायालयात हजेरी लावली, पण त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांना न्यायालयात बिनशर्त माफी मागण्याचा प्रसंग आला. या बिनशर्त माफी मागण्याच्या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक व शासनाने सावंतवाडी, कणकवली व तरळे येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करतानाच सावंतवाडी रक्तपेढीची रिक्त पदे भरली जातील, असे न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे आश्वासक सकारात्मक भूमिका कळविली. मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सकांनी सत्य प्रतिज्ञेवर सन २०१३ पर्यंत पूर्तता करणार असल्याचे शपथेवर सांगितले. त्या वेळी सावंतवाडी व कणकवलीमधील ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाची हालचाल केली, तर तरळेमध्ये जमीनच नसल्याचा शासनाला साक्षात्कार झाला. मात्र गेली दोन वर्षे सावंतवाडी किंवा कणकवलीचे ट्रॉमा केअर सेंटर सुरू झालेले नाही. त्यांना लागणारी पदेही भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे ऐकिवात नाही. शिवसेना-भाजपचे युती सरकार राज्यात येताच शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत आरोग्यमंत्री, तर सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर पालकमंत्री बनले. डॉ. दीपक सावंत यांच्या पहिल्याच दौऱ्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाचा शुभारंभ केला; पण हे कामही धिम्या गतीनेच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कणकवली व तरळेचे ट्रॉमा केअर सेंटर आणि जिल्ह्य़ातील डॉक्टरांची रिक्त पदे या समस्या कायम आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीसाठी कायम पदे भरण्याची गरज असताना न्यायालयाच्या याचिकेतील प्रतिज्ञापत्रानुसार कंत्राटी पद्धतीने पदे भरली गेली म्हणजेच न्यायालयालाही आरोग्य खात्याने कागदी घोडय़ांचा पवित्रा दाखविला. ही रिक्त पदे मार्चमध्ये मुदत संपल्यावर पुन्हा कंत्राटी पद्धतीने भरली गेली आहेत. जिल्ह्य़ात तापसरीची साथ असूनही क्षयरोगतज्ज्ञ रिक्त पदाला रक्तपेढी तांत्रिक तज्ज्ञाची जोड देऊन कारभार हाकला जात आहे. रक्त संक्रमण अधिकारी पदही रिक्तच आहे, तसेच कायमस्वरूपी तज्ज्ञ पदांच्या जागाही रिक्तच ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्यप्रश्नी दखलपात्र भूमिका घेऊन अभिनव फाऊंडेशन उच्च न्यायालयात गेले. मागील आघाडी सरकारच्या कारभारात जिल्ह्य़ाचे आरोग्य सुधारू शकले नाही म्हणून नव्या भाजप युती सरकारकडून अपेक्षा होत्या. त्यात पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीचे असूनही उपजिल्हा रुग्णालय बेदखलच ठरले आहे.