वादग्रस्त वक्तव्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी अडचणीत आले आहेत. बेळगावमध्ये होणाऱया नाट्य संमेलनात सीमाप्रश्नाचा विषय मांडणार नसल्याचे मोहन जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद गुरुवारी बेळगावमध्ये उमटले. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने या वक्तव्याचा निषेध केला असून, ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणारे नियोजित नाट्य संमेलन घेणे आपल्याला शक्य नाही, असा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्ष वीणा लोकूरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक झाली. त्यामध्ये जोशी यांच्या भूमिकेचा निषेध करणारे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. जोशी यांनी सीमाभागातील मराठी भाषकांबाबत जे वक्तव्य केले आहे, त्याच्याशी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा सहमत नाही. जोशी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने माफी मागावी, असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर जोशी यांच्या वक्तव्यामुळे ६ ते ८ फेब्रुवारीला बेळगावमध्ये होणारे नियोजित नाट्य संमेलन घेणे आम्हाला शक्य नाही, असाही ठराव मंजूर करण्यात आला.
बेळगावमध्येच झालेल्या पत्रकार परिषदेत जोशी यांनी सीमाप्रश्नाचा ठराव बेळगाव नाट्य संमेलनात मांडणार नाही. हे कलावंतांचे संमेलन आहे. त्यामुळे हा विषय त्या व्यासपीठावर मांडता येणार नाही, असे म्हटले होते. राजकारण्यांच्या संमेलनात कलावंतांविषयीचे ठराव मांडण्यात येतात का, असा प्रश्नही त्यांनी पत्रकारांना विचारला होता. सीमाप्रश्नाबद्दल आम्हाला काय वाटते ते दाखविण्याची नाट्य संमेलन ही जागा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या याच भूमिकेचा सीमावासियांनी तीव्र निषेध केला.