लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बारामती दौऱ्यावर आहेत. निवडणुकीत परस्परविरोधी टीका करणारे मोदी आणि पवार एकाच मंचावर  आज दिसले. इतकेच नाही तर मोदींनी भाषणादरम्यान पवारांवर स्तुतीसुमनांची उधळण केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, शरद पवार आणि माझे राजकारणातील मार्ग वेगळे आहेत. तरीही आमचे ध्येय मात्र एकच आहे ते म्हणजे देशाचा विकास. त्यामुळेच राजकीय विचार वेगळे असले तरी राष्ट्रनीती महत्त्वाची आहे. शरद पवारांसोबत महिन्यातून दोन ते तीन वेळा चर्चा होत असते.  त्यांच्यासारख्या नेत्याचे मार्गदर्शन माझ्यासारख्याने जरूर घेतले पाहिजे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या दृरदूष्टीचे कौतुक केले. बारामतीमध्ये मती आणि गती दोन्ही असल्याने बारामतीचा विकास झाला आहे.  शरद पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. अॅग्रो टेक्नॉलॉजीवर भर देणे आवश्यक असून, कृषीक्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्याची गरज आहे. शेतीला नुसतं पाणी देऊन उपयोग नाही, ठिंबक सिंचनसारख्या पद्धतीचा वापर करुन पाण्याची नासाडी टाळली पाहिजे, या पद्धतींमुळे शेतीलाही फायदा  होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती भेटीच्या पाश्र्वभूमीवर या उभय पक्षांमधील संबंध अधिक दृढ होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.