गेल्या शतकात ब्रिटिशांनी येथे कैदेत ठेवलेला तत्कालीन ब्रह्मदेशचा (म्यानमार) राजा थिबा याच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त म्यानमारचे उपराष्ट्रपती यु मयन्त सवे आणि लष्करप्रमुख अनुग हलाइंग येत्या १६ डिसेंबर रोजी येथील थिबा राजवाडय़ाला भेट देणार आहेत.

या दौऱ्यात हे ज्येष्ठ अधिकारी येथील थिबा राजाच्या समाधीस्थळालाही भेट देऊन आदरांजली अर्पण करणार आहेत. तत्कालीन ब्रह्मदेशचे राजेपद थिबाने ग्रहण केले. पण त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी ब्रिटिशांनी त्या देशावर स्वारी करून थिबाच्या सैन्याचा पराभव केला. त्यानंतर थिबाराजाचा प्रजेपासून संपर्क पूर्णपणे तोडण्यासाठी त्याला भारतात आणण्यात आले.

तत्कालीन मद्रास बंदरामार्गे थिबाला सहकुटुंब रत्नागिरीत आणले गेले. येथे काही काळ अन्य ठिकाणी ठेवल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या राजवाडय़ात त्याला हलवण्यात आले. पण तेथे फक्त सात वर्षांच्या वास्तव्यानंतर १ डिसेंबर रोजी थिबाराजाचे देहावसान झाले. हे ठिकाण आता ‘थिबा राजवाडा’ म्हणून पर्यटन स्थळ बनले आहे. थिबाराजाच्या वापरातील काही वस्तू आणि अन्य पुरातन कलात्मक वस्तूंचे छोटेखानी संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे.

रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थेतर्फे दरवर्षी जानेवारीत तीन दिवस येथे अतिशय दर्जेदार संगीत महोत्सव आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे या परिसराला पुन्हा एकवार ऊर्जितावस्था आली आहे. म्यानमारचे उपराष्ट्रपती व अन्य मान्यवर येत्या शुक्रवारी (१६ डिसेंबर) या ठिकाणी भेट देऊन आपल्या देशाच्या शेवटच्या राजाला आदरांजली अर्पण करणार आहेत.