राज्याच्या नव्या उद्योग धोरणात विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आवश्यक तरतुदी करण्यात येणार असून राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन एमआयडीसी स्थापण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी आलेल्या पत्रकारांशी राणे यांनी सुयोग भवनात संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या र्सवकष औद्योगिक प्रगतीविषयी सविस्तर चर्चा केली.
औद्योगिक दृष्टय़ा मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात मोठय़ा प्रमाणात उद्योग यावेत यासाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. उद्योगांना पोषक आणि चांगले वातावरण निर्माण करण्यात आले. त्यामुळेच या भागासह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहिले. कोणत्याही भागाच्या विकासासाठी तेथे उद्योग-धंद्यांची वाढ होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत असून येत्या उद्योग धोरणातही या बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. राज्यात स्वतंत्र पर्यटन एमआयडीसी स्थापन झाल्यास पर्यटनाशी संबंधित पोषक उद्योग येतील हा उद्देश असल्याचे राणे यांनी  स्पष्ट केले. अद्याप हा प्रस्ताव पूर्णपणे तयार झालेला नाही. मात्र, स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीचा निर्णय अंमलात आल्यास उद्योग क्षेत्राला नवे वळण मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
  राज्याचा औद्योगिक विकास झपाट्याने झाला आहे. उद्योजकांना चांगले आणि पोषक वातावरण निर्माण करुन देण्याचा हा परिणाम आहे. देशाच्या आíथक, औद्योगिक विकासात महाराष्ट्राचे अत्यंत मोलाचे योगदान आहेत, याचा राणे यांनी विशेष उल्लेख केला. शासनाच्या नियोजनपूर्व कामामुळेच राज्याचा दरडोई दर वाढला आहे. मानव निर्देशांकातही वाढ झाली असून शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातही राज्य आघाडीवर असल्याचा दावा राणे यांनी केला.