पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अधिक कमाई होणाऱ्या ठाण्यांमध्ये जाण्यासाठी कशी धडपड सुरू असते हे सर्वश्रुत असताना, बदली मिळालेल्या अशा ठिकाणाहून अन्यत्र बदली झाल्यास ती रद्द करण्यासाठी वरिष्ठांवरच कशा प्रकारे दबाव आणला जातो हे येथील एका सहायक उपनिरीक्षकाच्या बदलीवरून पुढे आले आहे.
शहरात राज्य राखीव पोलीस दलाकडून दोन ठिकाणी पेट्रोल पंप सुरू आहेत. यापैकी पालेशा महाविद्यालयाजवळील पंपावर उपनिरीक्षक एच. के. लोंढे हे व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहात होते. अलीकडेच लोंढे यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. लोंढे यांची बदली होताच लोकसेनेचे संस्थापक वाल्मिक दामोदर व सिद्धार्थ बोरसे यांनी थेट राखीव पोलीस दलाचे अधिकारी निरीक्षक आर. टी. तडवी यांनाच धमकावले. लोंढे यांची बदली का केली, याचा जाब विचारत पोलीस प्रशासनाशी काहीही संबंध नसलेल्या या व्यक्तींनी लोंढे यांची पेट्रोल पंपावरच नेमूणक करण्यात यावी, अन्यथा पाहून घेण्याची धमकीही दिली. राज्य राखीव पोलीस दलाच्या महिंदळे शिवारातील कार्यालयात दामोदर यांनी ही धमकी दिली. पोलीस निरीक्षक तडवी यांनी धमकीला भीक न घालता शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत दामोदरसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लोंढे यांच्याकडेच पेट्रोलपंप असावा यासाठी दामोदरसह इतरांचा आग्रह का, लोंढे हे अन्यत्र काम करू शकत नाहीत काय, या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास वेगळेच सत्य बाहेर येईल, असे धुळेकरांचे म्हणणे आहे. लोंढे यांची बदली करण्याचे यापूर्वीही अशस्वी प्रयत्न झाले. निरीक्षक तडवी यांनी मात्र दबावाला बळी न पडता त्यांची बदली केल्याने पोलीस अधिकाऱ्यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.