बारावीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून चित्रफीत काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघा तरुणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यावर २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली. दरम्यान लैंगिक अत्याचारप्रकरणी भाजपा, नागरिक व राष्ट्रवादीने पोलिसाना भेटून संशयित आरोपींना योग्य तपास करून खटला दाखल करावा अशी निवेदने दिली. बांदा भाजपा व ग्रामस्थानी निषेध मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले.

१७ वर्षीय कॉलेज युवतीचे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित भिकाजी प्रकाश सावंत (२६, रा. असनिये), जितेंद्र कृष्णा गावडे (२२, रा. घारपी, सध्या इन्सुली), आणि प्रवेश गजानन सावंत (२६, रा. तांबोळी) यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या घटनास्थळाचा बांदा पोलिसांनी पंचनामा केला, तसेच पुराव्यास्थळी घटनास्थळी सापडलेले काही पुरावेही हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणातील तिघेही संशयित वारंवार ब्लॅकमेल करून चित्रफितीबाबत बोलत. त्यामुळे युवतीने घडलेला प्रकार आई-वडील व नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे बांदा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. यातील संशयित भिकाजी सावंत मित्रासमवेत गेला असता पोलिसांनी ताब्यात घेतले.

या पीडित युवतीची व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियावरून मैत्री करत या युवकांनी तिच्यावर अत्याचार केले. तिला प्रेमाच्या मायाजालात अडकवून अत्याचार करतानाची चित्रफीतदेखील काढली. इन्सुली धुरीवाडी येथील जितेंद्र गावडे याच्या घरी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बांदा पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अबीद नाईक यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन प्रकरण गंभीरपणे तपासा आणि संशयित सुटणार नाहीत याची दक्षता घ्या असे आवाहन केले. यावेळी उदय भोसले, नम्रता कुबल हे उपस्थित होते.

बांदा भाजपा व ग्रामस्थांनीदेखील निषेध मोर्चा काढला. त्यात सरपंच मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, गुरुनाथ सावंत, अनुजा सातार्डेकर, अशोक सावंत तसेच भाजपाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.