तालुक्यातील सोयगाव येथील व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत पाच लाख ५७ हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग लुटणाऱ्या त्रिकुटास पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रसंगावधान दाखवून व्यापाऱ्याने ही लूट करणाऱ्यांपैकी एकाला घट्ट पकडून ठेवल्याने इतर दोघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले.
अनिल अण्णा पाटील (२५), धनराज कौतिक सूर्यवंशी (२६, दोघे रा. हिंमतनगर), स्वप्निल अशोक पाटील (२५, भायगाव रोड) अशी या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सोमवारी रात्री कल्पेश राजेंद्र भामरे (१७) हा मसाल्याचा व्यापारी दुकान बंद करून सोयगाव नववसाहतीमधील घराकडे निघाला असता दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यास अडवले व डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्याच्याजवळील पाच लाख ५७ हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर हे दोघे तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच धाडस करून कल्पेशने दुचाकीचालकाला पकडून ठेवत आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी दुचाकीसह चालकास कॅम्प पोलिसांच्या हवाली केले. त्याचा साथीदार मात्र बॅगेसह पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलीस तपासात पकडलेल्या दुचाकीचालकाचे धनराज सूर्यवंशी असे नाव असल्याची माहिती उघड झाली. त्याने दिलेल्या माहितीनुसार रोकड ठेवलेली बॅग पळवून नेणाऱ्याचे नाव स्वप्निल असल्याचे आणि या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार हा अनिल पाटील असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनी आठ दिवसांपासून या व्यापाऱ्यावर पाळत ठेवली होती. तसेच यापूर्वी तीन वेळा त्यांनी त्यासाठी केलेला प्रयत्न असफल ठरला होता. चौथ्या प्रयत्नात रक्कम लुटण्यात ते यशस्वी झाले खरे, पण एक साथीदार पकडला गेल्याने तुरुंगाची हवा खाण्याची वेळ या तिघांवर आली. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या समाधानला पाच दिवसांची, तर बुधवारी अटक करण्यात आलेल्या अन्य दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.