अ‍ॅसिड टाकून खून; महिला व दोन मुलांचा समावेश

कर्जत तालुक्यातील दुरगांव रस्त्यावरील जंगलात एक अनोळखी महिला (वय ३२), एक मुलगा (४) व एक मुलगी (६) अशा तिघांच्या अंगावर अ‍ॅसीड टाकून अतिशय भीषण व निर्घृणपणे खून करुन टाकण्यात आलेले मृतदेह आज, सोमवारी आढळले. आठवडय़ापूर्वीच शेवगाव येथे झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडानंतर घडलेल्या या तिहेरी खुनाने नगर जिल्हा हादरला आहे. मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तिघेही परप्रांतीय असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

कर्जतपासून १२ किमी अंतरावर कर्जत-दुरगांव रस्त्यावर वनविभागाचे जंगल आहे. या जंगलात तीन अनोळखी मृतदेह पडल्याचे गुराख्यांना आज दुपारी दोनच्या सुमाराला दिसले. त्यांनी हा प्रकार लगेच गावातील काही जणांना कळवला, वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरली, पोलीसही लगेच घटनास्थळी पोहचले. दुरगांव रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर पसरट खड्डा आहे, त्यात बाजूला महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था भीषण होती, अंगावर अ‍ॅसीड ओतल्यामुळे मानेपासून खालचा देह पूर्णपणे जळून कातडींचा रंग बदललेला आहे, उजव्या हाताच्या पंजाला कापल्यासारखी मोठी खोक पडली आहे, हातात धातूच्या बांगडया आहेत. अंगावरील साडी पाहून महिला गरीब कुटुंबातील वाटते. महिलेच्या मृतदेहापासून सुमारे १५ फुटावर छोटया मुलाचा मृतदेह आहे व जवळच मुलीचा मृतदेह आहे. दोन्ही मुलांच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्यामुळे शरीर जळून गेले आहे, पोट फुटून आतडी बाहेर आली आहेत, या तिन्ही मृतदेहांजवळ रक्त सांडलेले आहे.

महिलेचा रंग, चेहऱ्याची ठेवण, हातातील धातूच्या बांगडय़ा यावरून ती परप्रांतीय असावी असा संशय आहे, मुलेही महिलेचीच असावीत, असा कयास व्यक्त केला जातो. मृतदेहावरुन मारणारा किती निर्दयी असावा हेही लक्षात येते.

या परिसरात काल, रविवारी जोरदार पाऊस झाल्याने तिघांना जंगलात कसे आणण्यात आले, जंगलात मारण्यात आले की मारल्यानंतर जंगलात टाकण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनास्थळापासून जवळच कर्जत-श्रीगंोंदे रस्त्यावर, दुरगांव तलावालगत पुलाचे काम सुरू आहे, या कामावरील ठेकेदार व मजूर परप्रांतीय आहेत. तेथे काम करणारे काही कामगार सकाळपासून गायब झाल्याची माहिती मिळाली. त्यापैकी कोणी असावे असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या कामावरील मुकादमाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कामावर महिला मजूर नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काही कामगार सकाळी निघून गेल्याच्या माहितीस त्याने दुजोरा दिला आहे. पोलीस निरीक्षक वसंत भोये अधिक तपास करत आहेत.