नांदेड-हैदराबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकासह एक महिला आणि सात वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी येथून दर्शन घेऊन परतत असताना शुक्रवारी पहाटे नायगाव जवळील पळसगाव फाट्यावर हा अपघात झाला. जखमींवर नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कर्नुल जिल्हयातील रणजीतकुमार हे कुटूंबासह शिर्डीला दर्शनासाठी गेले होते. शिर्डीवरुन परतत असताना अपघात झाला. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर कार नायगावकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकला समोरुन धडकली. या अपघातात कारचालकासह अनुराधा आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर रणजीत कुमार यांच्यासह अन्य दोन गंभीर जखमी झाले. जखमींना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.