सोलापूर जिल्ह्यात हस्त नक्षत्राच्या पावसाने परिस्थिती बदलली असून या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या पुढे गेले आहे. मात्र या पावसामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याच्याही घटना घडत आहेत. बार्शी तालुक्यात वीज कोसळून तिघांचा अंत झाला. तर जिल्ह्यात वीज कोसळल्याने ३५ लहानमोठी जनावरे दगावली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात काल रविवारी १९.११ मिलीमीटर सरासरीने एकूण २१०.१६ मिमी एवढा पाऊस झाला. आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी आता ५१.१९ इतकी झाली आहे. सोमवारी सायंकाळीही आकाशात ढगांनी गर्दी करून पावसाची चाहूल दिली होती.
बार्शी तालुक्यातील पांगरी येथे दमदार पाऊस पडत असताना एका वस्तीतील झोपडीवर वीज कोसळून त्यात सीमा तुळशीदास माळी (४०) व अनिकेत विश्वनाथ माळी (१३) या दोघांचा मृत्यू झाला. माळी कुटुंबीय शेतात सोयाबीन पिकाची काढणी व शेळ्या राखण्याचे काम करीत असताना पावसाला प्रारंभ झाला आणि पावसाने चांगलाच जोर धरला. तेव्हा माळी कुटुंबीयांनी वस्तीवरील झोपडीचा आसरा घेतला. परंतु तेथेच वीज कोसळली.
याच तालुक्यात खांडवी येथे शेतात पाऊस पडत असताना झाडाखाली थांबलेल्या बलभीम नारायण गव्हाणे (२५) यांचा मृत्यू झाला. वैराग येथे वादळी वा-यासह पडलेल्या पावसामुळे एका शाळेच्या छतावरील पन्हाळी पत्रे उडून गेले. या तालुक्यात २१.३० मिमी पाऊस पडला.
सोलापूर शहरासह उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात दमदार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात ३३.४२ तर दक्षिण सोलापुरात २५.७१ मिमी पाऊस झाला. मोहोळ-२०.६३, पंढरपूर-२०.४५,सांगोला-२२.३४, करमाळा-१६.८८,मंगळवेढा-११.८७, अक्कलकोट-१४.३३, माळशिरस-१६.१० आणि माढा-७.१३ याप्रमाणे पावसाने हजेरी लावली.