तिघांचा मृत्यू; सहा जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. मुंबईकडून गोव्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी गाडीला ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
बोरिवलीहून सावंतवाडीकडे जाणारी व्ही. एम. ट्रॅव्हल्सची बस चिपळूणनजीक फरशी तिठय़ाजवळ आली असता, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने खासगी बसच्या चालकाकडील बाजूला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला.
अपघाताचा जोरदार आवाज ऐकल्यावर फरशी तिठा, वालोपे गावातील ग्रामस्थ, चिपळूण शिवसेना शहरप्रमुख राजू देवळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना घटनास्थळी धाव घेत लाइफकेअर रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला ट्रकचालक राजेंद्रकुमार (३४, उत्तर प्रदेश) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात खासगी बसमधील त्रिशा कृष्णा नाईक (२०, मुंबई), पल्लवी अहीर (४२, बांद्रा), संपत उत्तर घोरपडे (३३, सातारा), स्वाती सातर्डेकर (२५, जोगेश्वरी), चालक मल्लिकार्जुन मलकुंडवाड (४०, दहीवाडी, सातारा) हे जखमी झाले.
त्यांच्यावर लाइफकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरा अपघात चिपळूण शहरातील पाग नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर झाला.
मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या इनोव्हा कारने चिपळूण तहसीलमधील तलाठी चिंतामण सोनावणे हे रस्त्याच्या साइडपट्टीवरून जात असताना, त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्यावर उपचार सुरू असताना कराड येथील रुग्णालयात निधन झाले.
तर तिसरा अपघात महामार्गावरच कामथे येथे झाला. दुचाकी घसरून गंभीर जखमी झालेल्या सुदेश दौलत माटे (४०, कामथे) याचा डेरवण रुग्णालयात मृत्यू झाला.