लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा निवडून आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ११ वाजून ३ मिनिटांच्या मुहूर्ताला संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, अतुल सावे, बाबुराव कदम, महापौर कला ओझा यांच्यासह खैरे यांनी अर्ज दाखल केला. दिवसभरात तीन अर्ज दाखल झाले. आंबेडकर नॅशनल काँग्रेसच्या पुष्पा जाधव व अपक्ष काझी नसीरुद्दीन नईमोद्दीन यांनीही अर्ज दाखल केला.
लोकसभा निवडणुकीत आठ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू, असे जाहीरपणे सांगणाऱ्या उत्तमसिंह पवार यांना बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलविले. नाराज उत्तमसिंह पवारांबरोबर चर्चा होईल. नंतर ते परततील, तेव्हा त्यांची भूमिका जाहीर होईल, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. आपचे उमेदवार सुभाष लोमटे उद्या अर्ज दाखल करणार आहेत. मतदान यंत्रांवर उमेदवारांची अधिक नावे असावीत की कमीत कमी ठेवली जावीत, याचे गणितही घातले जात आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. अन्य उमेदवारही अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, काँग्रेसच्या गटात अजूनही तसा विस्कळीतपणा दिसून येतो. बुधवारी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. अचानक ते रद्द करण्यात आले. त्याचे कारण मात्र सांगितले गेले नाही. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला पालकमंत्री बाळासाहेब थोरात येणार होते. ते येऊ न शकल्याने कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा होती. मात्र, या वृत्तास कोणीही दुजोरा दिला नाही.
१२ बँकांमध्ये खैरे कुटुंबीयांची १ कोटी ९१ लाखांवर मालमत्ता
खैरे कुटुंबीयांची वेगवेगळ्या १२ बँकांमध्ये जंगम मालमत्ता १ कोटी ९१ लाख ४९ हजार ८७८ रुपयांची आहे. जमीनजुमला व चारचाकी गाडय़ांचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करताना खासदार खैरे यांनी गाडी किती जुनी हेदेखील आवर्जून कळविले आहे. ४३ तोळे सोने, १ किलो ६०० ग्रॅम चांदी यांसह बिडकीन येथे पत्नीच्या नावे जमीन असल्याची माहिती खैरे यांनी शपथपत्रात दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायासाठी हातउसनी देणी म्हणून १७ लाख ३४ हजारांची नोंद केली आहे. यात त्यांचे पुतणे सचिन खैरे यांनाही २७ हजार ७३० रुपयांचे देणे असल्याचे नोंदविलेले आहे.
मध्य विधानसभा मतदारसंघात २०२ क्रमांकाचे मतदार असणारे खासदार खैरे यांनी १९७३मध्ये इंग्रजी लघुलेखन शिकल्याची नोंद शपथपत्रात केली आहे. वेगवेगळे ६ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, तर २ गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांचा तपास सुरू असल्याचे नमूद केले आहे. निवडणुकांपूर्वी कुटुंबीयांच्या हातावरची रोकड मात्र केवळ ८५ हजार रुपयांची असल्याचे शपथपत्रात कळविले आहे. स्वत:कडे ५० हजार, पत्नीकडे २० हजार, मुलगा ऋषिकेशकडे १० हजार, मुलीकडे २ हजार व सुनेकडे ३ हजार असा तपशील नमूद करण्यात आला आहे.
सोमनाथ साखरे, जय भद्रा एंटरप्रायझेस व ऋषिकेश इंडस्ट्रीज यांच्याबरोबर खैरे यांचे आर्थिक व्यवहार आहेत. या व्यवहारात साखरे यांना आगाऊ स्वरुपात व कर्ज म्हणून ६७ लाख ३७ हजार ८९५ रुपये दिले असल्याची नोंदही करण्यात आली आहे. खैरेंकडे १९९०ची फियाट गाडी आहे. २००२ व २००७ची टाटा सफारी व दुचाकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. बिडकीन येथे गट क्र. ८३९मध्ये पत्नी वैजयंती यांच्या नावाने १५ एकर जमीन आहे. ही जमीन जुलै २००७मध्ये खरेदी करण्यात आली. खरेदीच्या वेळी त्याची किंमत १७ लाख ५० हजार होती. सध्या बाजारमूल्यानुसार ती किंमत ३ कोटी ७५ लाख रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. या शिवायही आर्थिक व्यवहारांचे तपशील शपथपत्रांमध्ये नमूद आहेत.