विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्य़ात सुरू झालेल्या उलथापालथीच्या राजकीय नाटय़ाचा पहिला अंक तीन दिग्गज नेत्यांच्या भाजपा प्रवेशाने येत्या गुरुवारी (४ सप्टेंबर) पूर्ण होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे माजी खासदार व कै. शंकरराव चव्हाण यांचे जामात भास्करराव पाटील खतगावकर, तसेच पेडन्यूज प्रकरणात अशोक चव्हाण यांना मोठा हादरा देणारे माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर या तिघांचा भाजपा प्रवेश गेल्या महिन्यात निश्चित झाला होता. त्यानंतर तारीख पे तारीख झाल्यानंतर शेवटी ४ सप्टेंबरचा मुहूर्त आता निघाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून खतगावकर व अन्य नेत्यांना भाजपाकडून तसा निरोप आला आहे.
भास्कररावांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा गेल्या महिन्यातच दिल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर सूर्यकांता पाटील यांनीही राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देताना पक्ष नेत्यावर अत्यंत विखारी टीका केली. ज्यांना आम्ही बाप मानले, त्यांनीच मान कापल्याचा आरोप शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी केला होता; पण त्यांच्या या कृतीवर पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
डॉ. माधव किन्हाळकर गेली १० वर्षे कोणत्याही पक्षात नाहीत. वरील दोन नेत्यांसोबत ते भाजपात जात असून भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या सौभाग्यवतींच्या विरोधात महायुतीकडून त्यांना उभे केले जाईल, असा अंदाज आहे. मात्र, या तिघांनी आपण उमेदवारीसाठी किंवा कोणत्या पदासाठी भाजपात जात नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणातील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. कंधारचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हेही शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आहेत.
मुखेड तालुक्यातील माजी आमदार किशन राठोड, माजी खासदार डी. बी. पाटील हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात गेले होते, आता आणखी तीन नेते भाजपात जात असल्याने जिल्ह्य़ात हा पक्ष शक्तिमान होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी आणि सामथ्र्यवान नेते आमच्या पक्षात दाखल होत आहेत, ही स्वागतार्ह बाब होय, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी म्हटले आहे.