संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर नॉयलॉन धाग्याच्या मांजावर नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्यात आली असली तरी ग्रामीण आणि शहरी भागांत या मांजाची सर्रासपणे विक्री होत असून या धाग्याने शहरातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
येवल्यात संक्रांत दिवाळीप्रमाणेच साजरी केली जाते. या दिवशी पतंग उडविण्याची सर्वत्र धमाल असते. पाच वर्षांपासून नॉयलॉनचा धागा मांजासाठी वापरण्यात येऊ लागला आणि या धाग्यामुळे हवेत उडणारे पक्षी, पादचारी आणि दुचाकी वाहनधारक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला. प्रत्येक वर्षी नॉयलॉनच्या धाग्यामुळे अनेक जण जखमी होऊ लागले. हे लक्षात घेत विविध संस्था व संघटनांच्या मागणीवरून यंदा जिल्हा प्रशासनाने नॉयलॉन मांजा विक्री व वापरणे, यावर बंदी घातली; परंतु बंदीची पर्वा न करता विक्री व वापर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या पथकाने येथील दोन व्यापाऱ्यांवर कार्यवाही केली होती. मात्र तरीही नॉयलॉन धाग्याच्या विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्याचा फटका यंदाही दुचाकी वाहनधारकांना बसू लागला आहे. शहरातील गंगादरवाजा परिसरातून दुचाकीवरून जात असताना जिभाऊ बारकू खैरनार (रा. निमगाव, ता. मालेगाव) यांच्या मानेभोवती नॉयलॉन धागा अडकला. त्यांची श्वसननलिका थोडक्यात बचावली. त्यांच्यावर १६ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. नारायण गंगाधर कोकाटे (रा. काळामारुती रोड, येवला) यांचा गाल व नाकाचा भाग दोऱ्याने कापला गेला. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली.
पुरुषोत्तम भट यांना हनुवटीजवळ दुखापत झाली. या तिघा जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. नगराध्यक्ष नीलेश पटेल, पोलीस निरीक्षकांनी जखमींची विचारपूस केली.