ट्रकवर मागून येणारी मोटार आदळल्याने झालेल्या अपघातात तीन ठार व तिघे जण जखमी झाले. हा अपघात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणंगला या गावी पहाटे झाला. या अपघातामध्ये मलेश अनर घागडे या पोलिसासह त्याची पत्नी मंगल घागडे, कल्पना अरिवद घागडे हे जागीच ठार झाले. तर जखमी चंदर अनर घागडे, जयश्री चंदर घागडे व चालक सद्दाम रेहमान उसमणी यांना कोल्हापुरातील खासगी इस्पितळात दाखल केले आहे. कोल्हापुरातील आजारी नातेवाइकांना पाहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
कर्नाटकातील गदग येथील घाडगे कुटुंबीय आहेत. त्यांचे नातेवाईक कोल्हापुरात राहतात. आजारी नातेवाइकाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घागडे कुटुंबीय अल्टो मोटारीतून कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास संकेश्वर नजीक बारा किलोमीटर अंतरावर कणंगला गावापासून ते जात होते. िहदुस्थान लेंटेक्स कंपनीजवळून मालवाहतूक ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. या ट्रकची गती अचानक कमी झाली. त्याचा अंदाज न आल्याने मागून येणारी मोटार ट्रकवर जोराने आदळली. या अपघातात घाडगे कुटुंबीयातील तिघे ठार झाले. याबाबत संकेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक कुमार हितळमणी तपास करत आहेत.