रायगड जिल्हय़ात तीन नवीन मच्छीमार जेट्टी बांधण्यास मंजुरी मिळली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) सहकार्यातून या जेट्टी बांधण्यात येणार आहेत. मुरुड तालुक्यातील एकदारा, अलिबाग तालुक्यातील थेरोंडा व उरण तालुक्यातील नवापाडा येथे या मच्छीमार जेट्टी बांधण्यात येणार आहेत. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडचे साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.
रायगड जिल्हय़ाला २४० किमीचा समुद्रकिनारा लाभला असून समुद्र आणि खाडीलगतच्या १०३ गावांत मासेमारी व्यवसाय चालतो. जिल्हय़ातील जवळपास ३० हजार लोक या व्यवसायाशी निगडित असून त्यांचे मासेमारी हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. रायगड जिल्हय़ात पाच हजार मासेमारी नौका असून, यात १ हजार ४९९ बिगरयांत्रिकी, तर ३ हजार ४४४ यांत्रिकी नौकांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात दरवर्षी जवळपास ४० हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते. यातील ३० टक्के मासे युरोप आणि जपानसारख्या देशांत निर्यात केले जाते. जिल्हय़ातील मच्छीमारांना मासळी उतरविण्यासाठी चांगल्या जेट्टी बांधून देण्यात याव्यात, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मुरुड तालुक्यात एकही चांगली मच्छीमार जेट्टी नव्हती. त्यामुळे या तालुक्यातील मच्छीमार सुसज्ज जेट्टय़ांसाठी आग्रही होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार सागरी तालुक्यांमध्ये मासेमारी जेटी विकासाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्य़ात यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अलिबाग तालुक्यातील वरसोली, चाळमाळा, उरण तालुक्यांतील कोंडरीपाडा, मुरूड तालुक्यांतील बोर्लीमांडला व मुरूड येथे जेट्टी बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यापकी वरसोली, चाळमाळा, कोंडरीपाडा व बोर्लीमांडला येथील जेट्टी बांधून पूर्ण झाल्या आहेत. मुरूड येथील जेट्टीचे काम मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही. या पाच जेट्टीसाठी १३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता तीन नवीन जेट्टय़ांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.