गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात मासेमारीचा बंदीकाळ एकच ठेवण्यात यावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील मासेमारीचा बंदी काळ १ जूनपासून सुरू होणार असून तो ६१ दिवस म्हणजे दोन महिने राहणार आहे. या निर्णयामुळे परप्रांतीय मच्छीमारी करणाऱ्यांची घुसघोरी थांबवण्याची शक्यता आहे.
गोव्या शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही राज्यांनाही बंदीकाळ समान असावा. या तिन्ही राज्यांच्या या समान बंदी काळाची चर्चा होऊन तसा करार करण्याचे ठरविले गेल्याचे मच्छीमारी खात्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
यापूर्वी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यांत मासेमारी बंदीचा काळ वेगवेगळा होता, त्यामुळे ट्रॉलर्सधारक मच्छीमारांचा धुमाकूळ असायचा. त्यावर नियंत्रणही नसायचे. बऱ्याचदा सिंधुदुर्गच्या किनारी परप्रांतीय ट्रॉलर्स धारकांनी घुसून मच्छीमारी केल्याने ट्रॉलर्स जप्तीची कारवाई केली गेली आहे. या तिन्ही राज्यांत मासेमारी बंदीचा काळ समान दोन महिने झाल्यास तिन्ही राज्यांच्या सागरकिनारी मच्छसंवर्धन होईल. तसेच अनधिकृत मच्छीमारी थांबेल असा कयास आहे. मात्र या काळात मासेमारी थांबल्यास खवय्यांचा मात्र हिरमोड होईल असे बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विजयदुर्ग, मालवण, शिरोडा अशा समुद्रकिनाऱ्यावर कायमच परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांनी स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना धुडकावत मच्छीमारी केली आहे. त्यात मालवणच्या जागृत मच्छीमारांनी ट्रॉलर्स व मासळी जप्त कपण्यास भागही पाडले आहे. सिंधुदुर्ग किनारा मच्छीमारीसाठी शेजारील राज्यांनी निवड केली आहे. त्यामुळे विपूल मच्छी सापडणाऱ्या या किनाऱ्यावर ट्रॉलर्सधारकांची घुसखोरी वाढत आहे. त्यासाठीही या तिन्ही राज्यांच्या मासेमारी बंदीचा काळ ठरविणाऱ्या बैठकीत चर्चा होऊन ठोस निर्णय व्हायला हवेत, असे जिल्ह्य़ातील मच्छीमारांना वाटते.