कमी पर्जन्यमान असलेल्या भागात राज्य सरकारने टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे. यात बीड जिल्हय़ातील आठ तालुक्यांचा समावेश असून, अंबाजोगाई, वडवणी व बीड या तालुक्यांना मात्र वगळण्यात आले. सरकारच्या निर्णयामुळे या तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी सवलतींपासून वंचित राहणार आहेत.
जिल्हय़ात २-३ वर्षांपासून कमी पाऊस पडत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाची जखम ताजी असतानाच या वर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जिल्हय़ातील ११ तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. असे असताना राज्याच्या महसूल व वन विभागाने केवळ आठ तालुक्यांतच टंचाईसदृश स्थिती असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.
पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाचा निकष ही स्थिती जाहीर करण्यासाठी लावण्यात आला आहे. पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, केज, परळी, धारूर व शिरुर या आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, बीड, अंबाजोगाई व वडवणी हे महत्त्वाचे तालुके वगळले. बीड तालुक्यात अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. दुबार पेरणी करूनही काहीच हाती लागणार नाही, अशी स्थिती आहे. या निर्णयामुळे या ३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना कृषीपंपाच्या चालू वीजबिलात ३३ टक्के सवलत मिळणार नाही. शेतसारा माफीलाही मुकावे लागेल. तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही फटका बसला असून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ होणार नाही.