जिल्ह्य़ात मंगळवारी होत असलेल्या ६८८ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्य़ा बाहेरहूनही पोलीस मदत मागवून घेण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुमारे तीन हजार जण तैनात करण्यात आले आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड सुरु केली आहे, आतापर्यंत सुमारे ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्य़ातील एकूणपैकी निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या, ७४९ ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणुक बिनविरोध झाल्याने ६८८ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या अराखडय़ानुसार तालुका व ग्रामपंचायतनिहाय बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. स्थानिक पोलीसांचे संख्याबळ अपुरे पडत असल्याने मुंबई रेल्वे, पुणे रेल्वे, नवी मुंबई, नाशिक ग्रामीण येथुन पोलीस मागवण्यात आले आहेत. या ठिकाणाहून सुमारे ६०० पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे आले आहेत.
स्थानिक एक हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्तास तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला सुमारे ९५० गृहरक्षक दलाचे जवान आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ाही आहेत. प्रत्येक पोलीस उपअधीक्षकांकडे धडक कृती दलाची मदत देण्यात आली आहे. नियंत्रणासाठी एकूण ११० अधिकारी आहेत. मतदान शांततेत पार पाडावे यासाठी पोलीसांनी समाजकंटकांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत सुमारे ७०० जणांवर वेगवेगळ्या कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या ७ हजार ४३४ जागांसाठी एकूण १४ हजार ३६७ उमेदवार िरगणात आहेत. निवडणूक होत असलेल्या ६८८ ग्रापंचायतींमधील २६० जागाही बिनविरोध झाल्या आहेत. तब्बल ११ हजार ९४२ उमेदवारांनी माघार घेतली. जाहीर प्रचाराची आज, रविवारी सायंकाळी सांगता झाली.
शंभरावर पंचायती संवेदनशील
जिल्ह्य़ातील १२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पोलीसांच्या दृष्टीने संवेदनशील ठरवल्या गेल्या आहेत. त्यातील ४ अतिसंवेदनशील आहेत त्यामध्ये सोनई व निंबळकचा समावेश आहे. शेवगाव, पाथर्डी, पारनेर तालुक्यातील निवडणुकांकडे पोलीस विशेष लक्ष ठेवून असतील. मतदानासाठी एकूण १६ हजार कर्मचारी तैनात आहेत. एकूण मतदारांची संख्या १३ लाख २६ हजार ८४१ आहे. त्यात महिला मतदारांची संख्या ६ लाख २५ हजार ६३१ आहे.