जिल्ह्य़ातील धामणेवाडा जंगलात वीज प्रवाहाने तीन बिबटय़ांची शिकार करण्यात आल्याचे रविवारी उघडकीस आले. या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी दोन आरोपींना अटक केली असून एकजण फरार आहे. एक मादी बिबट व दोन पिलांचे कुजलेले मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतले.  
नागझिरा अभयारण्याजवळील धामणेवाडा जंगलात झालेल्या या शिकारीची माहिती मिळताच नागपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील, गोंदियाचे उपवनसंरक्षक रामा राव, वन्यजीव विभागाचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल मेश्राम यांच्यासह काही वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांना चार महिन्यांच्या दोन पिलांसह मादी बिबट मृतावस्थेत आढळले. विजेच्या प्रवाहाने त्यांची शिकार करण्यात आल्याचे आढळून आले.  
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भांडारकर, डॉ. दियेवार यांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. यात या बिबटय़ांचा मृत्यू तीन-चार दिवसांपूर्वीच झालेला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. तीनही बिबटय़ांचे मृतदेह  शंभर फुटांच्या अंतरावर आढळले.
वन विभागातील अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी करून आरोपी रवी धुर्वे व निहालसिंग मरसकोल्हे यांना अटक केली असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी बाबुलाल भदाडे पसार झाला आहे. वीज प्रवाह सोडून बिबटय़ांची मांसासाठी शिकार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे, असे गोंदियाचे उपवनसंरक्षक रामा राव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.