कारणे अद्याप अस्पष्टच; वनखात्याचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

चंद्रपूर जिल्ह्य़ात गेल्या २७ दिवसांत तीन वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या तीनही वाघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने वनखात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यातील दोन वाघांचे मृत्यू संशयास्पद आहेत.

चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा वेळी वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी वनखात्याची असूनही गेल्या २७ दिवसांत तीन वाघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरी वन विभागात अनुक्रमे ८ व २६ एप्रिलला वाघीण व वाघाचा मृत्यू झाला. ८ एप्रिलला सिंदेवाही-पळसगाव वन परिक्षेत्रातील उमा नदीत वाघिणीचा मृतदेह तरंगताना आढळला. अवघ्या पाच वर्षांच्या या वाघिणीचा मृत्यू संशयास्पद आहे. वाघीण नदीच्या पात्रात कशी पोहोचली, तिचे वय पाहता तिचा मृत्यू नैसर्गिक कसा असू शकतो, तिची शिकार करण्यात आली असावी का, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर वनखात्याकडे नाही. २६ एप्रिलला सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव बिटाच्या कक्ष क्र. २५८ मध्ये वाघ मृतावस्थेत सापडला. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनखात्याने वर्तवला आहे. ४ मे रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत डोनी गावालगत अवघ्या दोन ते अडीच वष्रे वयाच्या पट्टेदार वाघाचा जंगलातील नाल्यात सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मात्र, त्याच्याही मृत्यूचे कारण अस्पष्टच आहे. अडीच वर्षांच्या वाघाचा नैसर्गिक मृत्यू होऊ शकत नाही, हे स्पष्ट असताना असा मृत्यू कसा होतो, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जे. पी. गरड यांनी दिलेल्या माहितीनुसार या वाघाचे तीन-चार दिवसांपूर्वीच कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्र आलेले होते. त्याची गणना पूर्ण वाढ झालेल्या वाघांमध्ये होणार होती. अशा वेळी त्याचा मृत्यू झाल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. त्याचे शवविच्छेदन करणारे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनीही वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही, असे सांगितले. वाघाचा मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने निश्चित अंदाज घेता येत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे, वनखात्याला वाघांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एकमेव हैदराबादच्याच प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागते. या प्रयोगशाळेचा जो अहवाल येईल तेच मृत्यूचे कारण गणले जात आहे. त्यामुळेच वनखाते वाघांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यात असमर्थ व अकार्यक्षम ठरत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.