प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अवमानकारक छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने येथील ख्रिश्चन समाजामध्ये त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कारवाईच्या मागणीसाठी समाजातील महिला व पुरुषांनी शहरातील कोठी चौकात सुमारे अडीच तास रास्ता रोको केले. रस्त्यावर भलेमोठे दगड टाकून टायरही जाळण्यात आले. दगडफेक करून काही वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या.
पोलिसांनी संबंधित वर्तमानपत्राचे संपादक व लेखकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे पुणे-औरंगाबाद रस्त्यावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.
यासंदर्भात ख्रिश्चन धर्मगुरू ताराचंद चक्रनारायण (रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी पुण्यातून प्रसिद्ध होणारे दैनिक ‘संध्यानंद’चे मालक, संपादक व लेखक धोंडिराम राजपूत या दोघांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला. तपासासाठी गुन्हा पुणे येथे वर्ग केला जाणार आहे. दैनिकाच्या कालच्या अंकात ‘गुड फ्रायडे’ निमित्त लेख व त्यासोबत येशूचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. विपरीत छायाचित्रामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार आहे.
राज्यात इतरत्रही आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर संतप्त ख्रिश्चन युवक येथील कोठी चौकात दुपारी जमा झाले. संबंधितांवरील कारवाईसाठी मोठे दगड टाकून कोठी चौक अडवण्यात आला. काही वेळाने पेटवलेले टायर रस्त्यात टाकण्यात आले. दुचाक्या अडवण्यासाठी युवकांनी रस्त्यावर बाटल्या फोडून काचा पसरवल्या. निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या जात होत्या. महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होत्या. रेव्हरंड पारधे, जॉन्सन शेक्सपिअर, रवींद्र ठोंबरे, सुनील सोनवणे, सुधीर शिंदे, आशुतोष आल्हाट, राजेश सूर्यवंशी, शरद शिंदे, रूपसिंग कदम, राजू साळवे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक यादवराव गायकवाड, निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे धडक कृती दलासह घटनास्थळी धावले. महापौर संग्राम जगताप, आ. अनिल राठोड, नगरसेवक दत्ता कावरे आले. प्रांताधिकारी राजेंद्र पाटीलही उपस्थित होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.