वन विकास महामंडळाच्या ब्रम्हपुरी विभागात येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रामध्ये तीन बछडय़ांना सोडून जंगलात निघून गेलेली वाघीण चोवीस तास उलटल्यानंतर बुधवारी पहाटे परत येताच वन अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
वन विकास महामंडळाच्या जंगलात वाघांची संख्या लक्षणीय आहे. त्यातल्या त्यात वाघीण आणि बछडय़ांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वन विभागाच्या गस्ती पथकाचे सातत्याने लक्ष असते. पाथरी येथे गेल्या २७ डिसेंबर रोजी चार बछडय़ांना सोडून बेपत्ता झालेल्या वाघिणीमुळे वन खात्याचे गस्तीपथक डोळय़ात तेल टाकून वाघांवर लक्ष ठेवून आहे. ब्रम्हपुरी वन विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील सावंगी फाटय़ाजवळील जंगलातील एका नाल्यात मंगळवारी वाघिणीचे तीन बछडे दिसले. गस्ती पथकाने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत वाघीण तिथे आलीच नाही. तीन बछडय़ांना सोडून ती बेपत्ता झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली. तिच्या शोधासाठी म्हणून वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सुधाकर डोळे, राजपूत यांच्यासह वन अधिकाऱ्यांचा ताफाच घटनास्थळी दाखल झाला. यावेळी अवघ्या काही दिवसाच्या बछडय़ांची काळजी घेण्यासाठी म्हणून डॉ. रविकांत खोब्रागडे यांनाही तिथे पाचारण करण्यात आले. ब्रम्हपुरी, सिंदेवाही, तळोधी व परिसरातील अख्ख्ये जंगल पिंजून काढण्यात आले. रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत तीन ते चार पथके वाघिणीच्या शोधात गुंतले होती. पहाटे पाच वाजताच्या सुमारास वाघीण जंगलातून पिल्लांच्या दिशेने येतांना दिसली. यावेळी डॉ. खोब्रागडेंना बछडय़ांपाशी बघून वाघिणीने डरकाळी फोडली. प्रसंगावधान राखून डॉ. खोब्रागडे गाडीत बसल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

वाघीण पहाटे पाच वाजता बछडय़ांजवळ आली. तीन बछडे आणि वाघीण सुखरूप आहे. वाघिणीने बछडय़ांसाठी करून ठेवलेली शिकार संपली असल्यामुळे ती शिकार करण्यासाठी जंगलात गेली असावी. शिकार केल्यानंतरच ती परत आली असावी
– सुधाकर डोळे, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक