येथील इरई नदीच्या काठावर श्री तिरुपती बालाजीचे मंदिर उभारण्यात आले असून १९ ते २३ एप्रिलपर्यंत वेद मंत्रासह मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन वेंकटेश्वरा स्वामी मंदिर ट्रस्टच्या वतीने स्थानिक दाताळा मार्गावरील नवनिर्मित श्री तिरुपती बालाजी मंदिरात करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, अखंड दीप आराधना, दीक्षाचरण, कंकनधारण, चतुर्वेद पाठ, स्त्रोत पाठ, मूर्ती आराधना व आरतीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता नवग्रह महाशांती हवन, मूर्ती हवन तळ धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार २० एप्रिलला सकाळी ८.३० वाजतापासून विष्णू महायज्ञ, भगवानची आराधना तथा दुग्धाभिषेक होईल. सायंकाळी ६ वाजता नवग्रह आराधना पारतात्मिका उपनिषद महायज्ञ व धार्मिक प्रवचन होईल. मंगळवार २१ एप्रिलला जोडप्यांद्वारे भगवानने जलकलश, पुत्र कामेष्टी महायज्ञ सायंकाळी ६ वाजता सामूहिक लक्ष्मी आराधनेचा कार्यक्रम होईल.
बुधवार २२ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता देवी-देवतांची आराधना, गुरू-पुत्र देवतांची विधीवत आराधना, एक भीमशक्ती कुंडात्मक, लक्ष्मी सुदर्शन महायज्ञानंतर फळांच्या रसाव्दारे भगवानाचा अभिषेक केला जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता मंदिरात प्राणप्रतिष्ठित होणाऱ्या सर्व देवी-देवतांच्या मूर्तीची तथा मंगल वाद्य मंत्रासह शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात केरळ, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशातील पारंपरिक वाद्य, विविध भजन मंडळे, कलशधारी महिला, घोडा व उंट आदी शोभायात्रेचे आकर्षण असणार आहे. ही शोभायात्रा भगवान श्री बालाजी, श्री लक्ष्मीदेवी तथा श्री भूदेवीच्या मूर्तीसह गांधी चौकातून जटपुरा गेट, रामनगर, दाताळा मार्गावरून इरई नदीच्या पुलावरून मंदिरात पोहोचेल.
सकाळी विधिवत प्राणप्रतिष्ठेनंतर भगवान बालाजी मंदिरात विराजित होणार आहेत. देशातील प्रमुख नद्यांच्या पाण्याने भगवान श्री बालाजींच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे. गुरुवार २३ एप्रिलला दाताळा गावातील हनुमाना मंदिरात शिवलिंग, गणेश, नंदी, नवग्रह, नाग देवता आदी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. सकाळी १०.५१ वाजता बालाजीच्या मूर्तीची स्थापणा, श्री लक्ष्मी देवी तथा श्री भूदेवी विग्रह प्रतिष्ठा, अष्टग्पिाल प्रतिष्ठा, ध्वज स्तंभ स्थापणा, द्वारपाल प्रतिष्ठा, मूर्ती प्राण प्रतिष्ठा व पूर्णाहूती आरतीचा कार्यक्रम होईल. याप्रसंगी श्री राजमलजी पुगलिया परिवाराच्या वतीने आरतीनंतर दुपारी १२ ते सायंकाळी ७ या कालावधीत महाप्रसदाचे वितरण केले जाणार आहे. याच दरम्यान श्री तिरुपती बालाजी मंदिरामध्ये विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ एप्रिलला रात्री ८ ते सकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर परिसरात घेण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नरेश पुगलिया यांनी केले आहे.