पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष अशी हेटाळणी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता राज्यभरात मुसंडी मारली आहे. पुणे जिल्हा हा तर राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच मानला जातो. आगामी काळात हा गड अभेद्य ठेवण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी आतापासूनच व्यूहरचना केली  असून आपल्याकडील मतदारसंघ कायम राखतानाच सध्या प्रतिस्पध्र्याकडे असलेल्या जागा खेचून आणत जिल्ह्य़ात ‘सबकुछ’ राष्ट्रवादी करण्याचे पक्षाचे धोरण राहणार आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पुणे जिल्हा त्यांच्या पाठिशी राहिला आहे. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या अजित पवार यांनी ‘मिशन २०१४’ ची मांडणी करताना पुणे जिल्ह्य़ातून अधिकाधिक जागा निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातून दिलीप वळसे (आंबेगाव), वल्लभ बनके (जुन्नर), दिलीप मोहिते (खेड), अशोक पवार (शिरूर), बापू पठारे (वडगाव शेरी), अण्णा बनसोडे (िपपरी) हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले, तर रमेश थोरात (दौंड), विलास लांडे (भोसरी), लक्ष्मण जगताप (चिंचवड) हे अपक्ष म्हणून निवडून आले व राष्ट्रवादीच्या गोटातच सामील झाले. काँग्रेसने ग्रामीणमध्ये हर्षवर्धन पाटील (इंदापूर) व संग्राम थोपटे (भोर) तर शहरात विनायक निम्हण (शिवाजीनगर) व रमेश बागवे (कॅन्टोन्मेंट) अशा जागा मिळवल्या. शिवसेनेने चंद्रकांत मोकाटे (कोथरूड), विजय शिवतारे (पुरंदर), महादेव बाबर (हडपसर), भाजपने गिरीष बापट (कसबा), माधुरी मिसाळ (पर्वती), बाळा भेगडे (मावळ) यांच्यासह खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मनसेकडील जागा भीमराव तापकीर यांच्या रूपाने आपल्या खात्यात जमा केली.
अलीकडेच िहजवडीत झालेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजितदादांनी पुण्यातील संख्याबळ वाढवण्याचा निर्धार व्यक्त करताना बऱ्याच महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार नाहीत, त्या मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित करा, आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि पक्ष म्हणून एकत्र या, असा त्यांच्या आवाहनाचा सूर होता. ज्या जागा पराभूत झाल्या  त्या स्थानिक पातळीवरील आपापसातील भांडणामुळे गेल्याचे सांगत मावळचे उदाहरण त्यांनी दिले. मावळमध्ये पक्षाला मतदान चांगले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळते. मात्र, गटातटामुळे विधानसभेत अपयश येते, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. सगळं काही मलाच मिळालं पाहिजे, असे काही समजू नका, अशी सूचक तंबीही त्यांनी दिली होती. आता लोकसभेच्या बरोबरीने विधानसभेच्याही तयारीला राष्ट्रवादीने तितकेच महत्त्व दिले आहे.
राष्ट्रवादीचा महायुतीशीच ‘लढा’; प्रत्येक मतदारसंघात उमेदवार
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून पदाधिकारी – कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. काही प्रमाणात गट-तट असले तरी लोकसभेच्या वेळी सर्वजण एकत्र येतील व पक्षाला यश मिळवून देतील, असा दावा राष्ट्रवादीचे पुण्याचे निरीक्षक यशवंत भोसले यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला. आघाडीचा निर्णय ‘साहेब’ घेणार असून तोपर्यंत सगळ्याच मतदारसंघात उमेदवार तयार ठेवण्याचे धोरण राहणार आहे. जिल्ह्य़ात महायुतीशीच लढा द्यावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.