महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नाशिक, औरंगाबाद व अमरावती या तीन जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर ‘क्राईम अगेन्स्ट वूमन सेल’ या विशेष कक्षांची स्थापना केली जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी येथे दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, शनिवारी आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने हे विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांशी संबंधित प्रकरणांचा जलदगतीने तपास, संकटावेळी तात्काळ प्रतिसाद, या संकल्पनेवर हा कक्ष कार्यान्वित राहील, असे या वेळी सांगण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत नाशिक पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाने आपापला आराखडा जिल्हा प्रशासनास यापूर्वीच सादर केला आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयामार्फत एक पथक अलाहाबाद येथे पाठविण्यात आले आहे. तेथील बंदोबस्त व नियोजनाचा पॅटर्न नाशिकच्या सिंहस्थात राबविण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, असे दयाल यांनी नमूद केले. महाराष्ट्राची लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पोलीस बळ कमी असून त्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. आगामी पाच वर्षांत ६३ हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडून लवकरच शासनास सादर केला जाईल. नक्षलवाद्यांच्या वाढत्या प्रभावावर बोलताना त्यांनी गडचिरोली व गोंदिया वगळता राज्यात इतरत्र या चळवळीचे अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले. उपरोक्त जिल्ह्यात पोलीस कुमक वाढवितानाच केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणा सक्षम केली जात असल्याचे दयाल यांनी नमूद केले.