जिल्हय़ातील अशोक (श्रीरामपूर) आणि सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदे) या दोन सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवार) मतदान होणार आहे.
दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीसाठी चुरस असली तरी सत्ताधारी गटाने मात्र परिवर्तनाची शक्यता फेटाळून पुन्हा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दोन्ही कारखान्यांतील संचालकांच्या २१ जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हय़ातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका मोठय़ा चुरशीने लढवल्या गेल्या. प्रचाराच्या काळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या.
अशोक कारखान्यात सत्ताधारी गटाचे सूत्रधार, माजी आमदार भानुदास मुरकुटे विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार जयंत ससाणे, शेतकरी संघटना यांच्या आघाडीत चुरस आहे. दोन्ही गटांत सरळ लढत होत असून २१ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीपासून माजी खासदार गोिवदराव आदिक व माजी खासदार बाळासाहेब विखे हे तटस्थ आहेत. कारखान्याची सत्ता सन १९८७ पासून मुरकुटे यांच्या ताब्यात आहे. १० हजार ९९७ सभासद मतदानासाठी पात्र आहेत.
नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नागवडे व माजी मंत्री बबनराव पाचपुते या पारंपरिक विरोधकांमध्येच चुरस आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून कारखान्याची सत्ता नागवडे यांच्याच ताब्यात आहे.