रिक्षाचालकांच्या परवान्याबाबत उद्या (बुधवारी) होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तत्पूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाशिकप्रमाणेच शिर्डी आणि राहात्यातील डिझेल रिक्षांना परवाने देण्याबाबत सहानुभूतीने विचार करावा. नगरमध्ये शिल्लक असलेले परवाने श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून वितरित करावे अशी मागणी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
विखे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील अ‍ॅपेरिक्षा संघटनेने मंगळवारी नगर येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिका-यांची भेट घेतली. बैठकीत विखे यांनी सांगितले, की शिर्डी व राहाता परिसरातील रिक्षा वाहन व वाहनचालकांच्या परवान्यामुळे पंधरा दिवसांपासून बंद आहेत. वाहनचालकांच्या परवान्याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र रिक्षांच्या परवान्यांबाबत स्थानिक पातळीवरच उपप्रादेशिक परिवहन विभागाने सविस्तर माहिती घेऊन परवाने देण्याबाबत धोरण तयार करावे. नगर विभागात मोठय़ा प्रमाणात परवाने शिल्लक आहेत. हे परवाने श्रीरामपूर विभागात देऊन तेथील रिक्षाचालकांना वितरित करावेत असे विखे यांनी सूचित केले. डिझेल रिक्षा सध्या बंद असल्या, तरी नाशिक येथे या रिक्षांची वाहतूक सुरू आहे याकडे विखे यांनी अधिका-यांचे लक्ष वेधून याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना तपासून जिल्ह्यातही त्याची कार्यवाही करावी असे आवाहन त्यांनी केले.
विखे यांनी याबाबत मुंबई येथे परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांचीही भेट घेतली आहे. नगर येथील बैठकीला रिक्षा संघटनेचे चंद्रकांत शेळके, अजय जगताप, खलिउद्दीन शेख, राजीव बारहाते, बाबासाहेब सोमवंशी, दादाभाई इनामदार आदी उपस्थित होते.