जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोल्याचे सुपुत्र सुमेध वामन गवई यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. लष्करी इतमामात त्यांच्यावर मूळ गावी लोणाग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, गवई यांच्या कुटुंबियांसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

आज सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद सुमेध गवई यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी लोणाग्रा येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला सारा गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ गोळा झाले होते.

जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील सीमावर्ती गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याच्यावतीने शोध मोहीम राबवण्यात येत होती. यावेळी झालेल्या दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. त्यांना भारतीय दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पण दहशतवाद्यांनी अंदाधुंदपणे केलेल्या गोळीबारात अकोल्याच्या सुमेध गवई यांच्यासह तामिळनाडू येथिल जवान इलियाराजा पी. यांना वीरमरण आले होते. दरम्यान, चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाले होते.

सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते.