सनी शरद शिंदे या दलित युवकाच्या हत्येप्रकरणी भारिपचे नेते खासदार रामदास आठवले उद्या (शनिवार) नगरला येणार आहेत. याबाबतची सर्व माहिती कार्यकर्त्यांनी त्यांना कळवली आहे. दरम्यान सनीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाली नगरला आणल्यानंतर त्याच्या निवासस्थानी बुरुडगाव रस्त्यावर मोठा जमाव जमला होता. मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
सनी याच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचा निर्णय शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार आठवले यांच्या उपस्थितीतच शनिवारी अंत्यविधी केला जावा, याबाबत आग्रही होते. मात्र भारिपचे पदाधिकारी अशोक गायकवाड, अजय साळवे, सुनील साळवे हे त्यांची समजूत घालत होते. मात्र उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता.
खुनाचा गुन्हा काल, गुरुवारी रात्रीच दाखल झाला. आज औरंगाबाद येथील रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. युवक दलित असल्याने तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामाही करण्यात आला. सायंकाळी सनीचा मृतदेह त्याच्या बुरुडगाव रस्त्यावरील निवासस्थानी आणण्यात आला, त्या वेळी मोठा युवकांचा मोठा जमावही जमला होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मालकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
याच प्रेमप्रकरणातून सनी, त्याचा भाऊ व वडील या तिघांविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा २३ मे राजी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नंतर त्याचा व मुलीचा शोध लागल्यानंतर सनीविरुद्ध बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. तर त्याचा भाऊ व वडील न्यायालयीन कोठडीत होते. बाल सुधारगृहातून सनी दि. ३० मे रोजी पळून गेला होता. त्याची हत्या होईपर्यंत शोध लागलेला नव्हता. त्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाटोद्यातील वंजारा फाटा ते नगर दरम्यानच्या रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे आढळला. याबाबत वकिल विलास अंबादास पवार यांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार पाटोदा पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर नातेवाइकांनी दिलेल्या फियादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघे गुरुवारीच कोतवालीत हजर!
पाटोदा पोलिसांनी या गुन्ह्य़ात ताब्यात घेतलेले चौघेजण गुरुवारी दुपारीच नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाल्याचे खात्रीलायक समजले. सुरुवातीला त्यांनी पाटोद्याच्या घटनेची चौकशी केली, मात्र गुन्ह्य़ाची माहिती कोतवाली पोलिसांना नसल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निरीक्षक मालकर यांनी रात्रभर याबद्दल चौकशी केली. खात्री झाल्यावर व पाटोदा पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर आज पहाटे त्यांची रवानगी पाटोदा पोलिसांकडे करण्यात आली. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच चौघे जण पोलिसांकडे हजर झाले होते.