यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची’ हा चित्रपट येत्या १४ मार्चला राज्यभरातील सुमारे २५०हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टीचे नेते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची’ हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या शुक्रवारी (१४ मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती राज्य शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे. या चित्रपटाचे लोकार्पण सोहळा येथील प्रीतिसंगमावर होणार आहे.
या कार्यक्रमास चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, यशवंतरावांची भूमिका साकारणारे अशोक लोखंडे आणि ओम भूतकर, वैशाली दाभाडे यांच्यासह कलाकार उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार गायक शंकर महादेवन आणि नंदेश उमप हे यशवंतरावांना सूरसंगीताची आदरांजली वाहणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सामाजिक, सांस्कृतिक कार्य, लोकाभिमुख निर्णय, दिल्लीमध्ये महाराष्ट्राची जपलेली अस्मिता अशा विविध टप्प्यांनी सजली होती. यशवंतरावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे खूप मोठे आव्हान पटेल यांनी पेलले आहे. यशवंतरावांची ही झंझावाती कारकीर्द पटकथेतून परिणामकारकरीत्या मांडण्याचे काम ज्येष्ठ लेखक, पत्रकार अरुण साधू यांनी केले आहे. पटकथेसोबतच चित्रपटातील गीतेही कथानकाचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. संगीताची जबाबदारी आनंद मोडक यांनी सांभाळली आहे. चित्रपटात १६ गाणी असून, ती ना. धों. महानोर, कुसुमाग्रज आणि विठाबाई चव्हाण यांनी लिहिली असून, अनेक नामवंत गायकांनी ती स्वरबद्ध केली आहेत. अशोक लोखंडे, सलीम, ओम भूतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहुल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन सय्यद लायक अली यांचे, तर संकलन नितीन रोकडे यांचे आहे. लीला गांधी यांनी नृत्यदिग्दर्शन, कला व वेशभूषा श्याम भूतकर आणि मोहन रत्नपारखी, रंगभूषा विक्रम गायकवाड यांनी केली आहे.