परंपरेने चालत आलेली जिवंत नागाची पूजा करण्यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही शिराळ्यात बंद पाळण्यात आला. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिष्टमंडळाशी ५ जुलै रोजी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. आ. शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
जगप्रसिध्द असलेल्या शिराळा येथील नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करण्यास अथवा मिरवणूक काढण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. मात्र शिराळकरांची भूमिका ही ऐतिहासिक पूजेची परंपरा असल्याने या संसदेने हस्तक्षेप करून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आहे. या मागणीसाठी शिराळ्यातील नागमंडळाचे कार्यकत्रे व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकत्रे यांनी आंदोलन सुरू केले आहे.
कालपासून शिराळा बंद पाळण्यात येत असून आज दुसऱ्या दिवशीही गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. तहसील कार्यालयासमोर कार्यकत्रे लाक्षणिक उपोषणही करीत आहेत. या आंदोलनाची दखल घेत आ. नाईक यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांच्याशी संपर्क साधला. या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करावा आणि नागपूजेस परवानगी मिळावी अशी मागणी केली. याबाबत ५ जुल रोजी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येईल असे जावडेकर यांनी सांगितले असल्याचे नाईक म्हणाले.