५ व २० रुपये किलो दरामुळे सांगलीत शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडली

हिरवी मिरची २० रुपये किलो तर टोमॅटो ५ रुपये किलो! सांगलीच्या बाजारातील हा आजचा दर आहे. या दरातून या पिकांच्या काढणीचा खर्चही निघत नसल्याने शेतक ऱ्यांना अत्यंत दु:खाने ही पिके सध्या शेतातच सोडून द्यावी लागत आहेत.

बाजारात महिन्यापूर्वी हिरव्या मिरचीचा भाव शंभरी पार तर टोमॅटोचा भाव पन्नासहून अधिक होता. चांगला भाव आणि पावसामुळे वाढलेले उत्पादन यामुळे गेल्या काही दिवसात या दोन्ही पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात बाजारात आले आहे. यामुळे कालपासूनच या दोन्ही पिकांचे दर मोठय़ा प्रमाणात कोसळले. सध्या इतर भाजीपाल्याचे दर पुन्हा उतरले आहेत. किरकोळ बाजारात सध्या वांगी, कोबी, कारले, दुधी, घेवडा, दोडका या फळभाज्यांचे दर किलोला तीस रुपयापर्यंत उतरले आहेत, तर टोमॅटो पाच ते सात रुपयांना किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. हिरवी मिरची एक महिन्यापूर्वी तिखट झाली होती. त्या वेळी मिरचीचा किलोला १२० रुपयांवर पोहचला होता. सध्या किरकोळ विक्री दहा रुपये किलोने होत आहे. किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर चढे असले तरी ठोक सौद्यामध्ये हे दर निम्म्यावर आहेत. व्यापाऱ्यांकडून टोमॅटोला दहा किलोला केवळ ३० ते ४० रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे हा दर काढणी व वाहतूक खर्चापोटीच जात असल्याने ही पिके परवडत नाहीत. ६० रुपयांवर गेलेला सिमला मिरचीचा दर सध्या ठोक व्यापारात अवघा ७ रुपयांवर आला आहे. याशिवाय पालक, मेथी, राजगिरा, लाल माठ या पालेभाज्यांचे दर दोनशे रुपये शेकडा असा झाला आहे.